अकोट : गेल्या १५ दिवसांमध्ये अकोट तालुक्यात दुसऱ्या लाटेतील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत २ हजार १० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ही तालुक्यासाठी दिलासादायक बाब असली तरी, याच कालावधीत शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा वाढलेला आलेख चिंताजनक असून प्रशासनाने व नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.
अकोट तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या टेस्टचे प्रमाण वाढले आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे चाचण्यांवर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ हजार १० एवढी झाली आहे. त्यामध्ये शहरात १ हजार २७० तर ग्रामीण भागात ७४० रुग्ण बरे झाल्याची २ मेपर्यंतची आकडेवारी आहे. विशेष म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी केवळ १५०४ रुग्ण बरे झाले. यामध्ये आता ५०० बरे झालेल्या रुग्णांची भर पडली आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असले तरी ग्रामीण भागात मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १८६ तर शहरात १३१ रुग्ण आहेत. ग्रामीण भागात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गत तीन दिवसांत ग्रामीण भागात हा आकडा २५० पर्यंत पोहोचला आहे. कोरोना संदर्भातील ५ मेच्या दैनंदिन अहवालात तालुक्यातील नांदखेड या एकाच गावात २९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरात कोरोना आटोक्यात येत असला तरी ग्रामीण भागातील ही वाढती संख्या धोक्याची घंटा ठरत आहे.
ग्रामीण भागात शुकशुकाट, तरीही रुग्णसंख्येत वाढ
ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये शुकशुकाट आहे. पोलिसांची गस्त व उन्हाळा यामुळे अनेक जण घरातच आहेत. तर काही हौशी लोक अकोट शहरात बाजारपेठेत फेरफटका मारत आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागात कोरोनासदृश्य रुग्णांचे मृत्यूही होत आहेत. पंचायत समिती स्तरावरील ग्रामपंचायतची यंत्रणा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष न दिल्यास गावेच्या गावे कोरोनाच्या विळख्यात येण्याची शक्यता आहे.
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर सुट्टीवर
कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासा देणारे आहे. परंतु ग्रामीण रुग्णालयात शहर व तालुक्यातील रुग्णांची कोरोना टेस्ट सुरू आहे. अशावेळी ग्रामीण रुग्णालयातील दोन डॉक्टर सुट्टीवर आहेत. तर एक महिला डॉक्टर ४८ तासांपासून कर्तव्यावर आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील गावांची संख्या पाहता आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.