अकोला : इयत्ता नववी सन २०१९-२० मध्ये अकोला जिल्ह्यातील एकूण २९ हजार ३७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु यंदा रद्द करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २६ हजार ९७७ विद्यार्थ्यांनीच अर्ज भरले होते. उर्वरित २ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्जच भरले नसल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे गतवर्षी मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षाच घेण्यात आली नाही. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना धडे देण्यात आले. परीक्षा न घेता, केवळ मूल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. इयत्ता नववीतील एकूण २९ हजार ३७६ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून त्यांना, दहावीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. त्यापैकी पुढे २६ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करून नोंदणी केली. परंतु उर्वरित २ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणीच केली नसल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतर करावे लागले. कौटुंबिक अडचणी व इतरही काही कारणांमुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले.
या कारणांमुळे बसले नाहीत परीक्षेला...
१) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गतवर्षी अनेक उद्योग, व्यवसाय बंद झाले. त्यामुळे काही कुटुंबातील मजूर, नोकरदारांना स्थलांतर करण्याची वेळ आली. यासोबतच आई, वडिलांचे आजारपण, कौटुंबिक अडचणींमुळे नववीनंतर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही.
२) परराज्य, परजिल्ह्यातून रोजगार, नोकरीनिमित्ताने अकोला जिल्ह्यात आलेले अनेक जण कोरोनामुळे बेरोजगार बनले. व्यवसाय, उद्योग बंद पडले. मजुरीची कामे थांबली. कोराेनाचा प्रादुर्भाव पाहता, अनेकांनी आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेही काही विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेला मुकावे लागले.
३) काही पालक व विद्यार्थ्यांना, कोरोनामुळे परीक्षा होतील की नाही? अस वाटले, तसेच कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास झाला नाही. ग्रामीण भागात तर नेटवर्कची अडचण असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी निर्माण झाल्या. त्यात शिकवणी वर्गही बंद असल्याने, अभ्यास कसा करावा, शैक्षणिक समस्या, अडचणी कशा सोडवाव्यात, असे प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात दहावीच्या परीक्षेविषयी अनामिक भीती निर्माण झाली. परीक्षा दिली तर चांगले गुण मिळतील की नाही? परीक्षा पास होऊ की नाही? त्यामुळे यंदा ड्रॉप घेऊन पुढीलवर्षी दहावी परीक्षेची तयारी करू, या विचारानेही अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्जच भरले नाहीत.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणच थांबले. परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोरोनामुळे अनेकांनी स्थलांतर केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेचे अर्ज भरले नाहीत. त्यामुळे त्यांचे शिक्षण थांबले आहे. नववीच्या आकडेवारीवरून दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दहावीचे अर्ज भरले नाहीत.
- दिलीप तायडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
जिल्ह्यातील नववी उत्तीर्ण विद्यार्थी - २९३७६
दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी - २६९७७