लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आरोग्य विभागांतर्गत राज्यभरात मुख स्वास्थ्य तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार अमरावती विभागात ३० वर्षे वयोगटातील १ लाख ३४ हजार ९९७ महिला व पुरुषांची मुख तपासणी करण्यात आली. यातील तब्बल ३६ हजार ४७ महिला, पुरुषांना मुख कर्करोग असल्याची धक्कादायक माहिती विभागीय आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे, यातील ७४७ रुग्णांचे तोंड उघडणे अशक्य असल्याचे निदर्शनास आले आहे.सद्यस्थितीत मुखाचा कर्करोग वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने माजी आरोग्यमंत्री अरविंद सावंत यांनी आरोग्य विभागाला राज्यातील मुख स्वास्थ्य तपासणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यभरात दंत वैद्यकीय विभागाद्वारा शहर आणि ग्रामीण भागात विविध प्रकारे तपासणी करण्यात आली. अमरावती विभागात ३० वर्षे वयोगटातील एकूण १ लाख ३४ हजार ९९७ रुग्णांची तपासणी झाली. यामध्ये ६४ हजार ७७८ महिला व ७० हजार २१९ पुरुषांचा समावेश आहे. यापैकी ९७ हजार ४७७ नागरिकांचे मुख स्वास्थ्य स्वच्छ, तर २९ हजार ९०४ नागरिकांचे मुख स्वास्थ्य अस्वच्छ असल्याचे स्पष्ट झाले आहे. दारू सेवनामुळे मुखरोगाने ग्रस्त १२ हजार ३४ रुग्ण आहेत. तंबाखू, सुपारी सेवनामुळे मुखरोगग्रस्तांची संख्या २४ हजार ७ एवढी आहे; मात्र गुटखा तासंतास तोंडात ठेवण्याची सवय जडलेल्या बहुतांश रुग्णांपैकी ७४७ रुग्णांचे तोंड बंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच खानपानात अतिरेक केल्याने गाल, ओठ, जीभ, टाळू यापैकी एक किंवा अनेक ठिकाणी पांढरा चट्टा आलेले १७८ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच लाल चट्टा असलेले ९२ आणि तोंडात दीर्घकाळ जखम असलेले ४६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २७० रुग्णांवर यवतमाळ आणि अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाद्वारा प्राप्त झाली आहे.
पाचही जिल्ह्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मुख स्वास्थ्य तपासणी आॅक्टोबर महिन्यात करण्यात आली. ६ नोव्हेंबर रोजी सदर अहवाल प्राप्त झाला. यातील संदर्भित २७० रुग्णांवर यवतमाळ आणि अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचार सुरू आहे.- आर. एस. फारुकी, आरोग्य उपसंचालक, अकोला परिमंडळ.