अकोला : १५ ते १७ वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणाला सुरुवात होऊन महिनाभराचा कालावधी लाेटला असून, दुसऱ्या डोसची मुदत सुरू झाली आहे. लसीकरणाच्या बाबतीत उत्साहात असलेल्या बालकांनी लसीच्या दुसऱ्या डोसलाही चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. पहिल्या सात दिवसांतच २ हजार ८४४ बालकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १५ ते १७ वर्षे वयोगटातील सुमारे ९५ हजार १५ बालकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४३.६७ टक्के म्हणजेच ४१ हजार ४९४ बालकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. महिनाभरातच बालकांच्या लसीकरणाचा हा टप्पा गाठण्यात आला आहे. यावरून बालकांना लसीचे महत्त्व पटले असून, मोठ्यांना कधी कळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अशी आहे लसीकरणाची स्थिती
वर्ग - पहिला डोस - दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी - १३,७४७ - १२,६२२
फ्रंटलाईन वर्कर्स - १४,२७२ - १३, ७१३
१५ ते १७ वर्ष - ४१,४९४ - २,८४४
१८ ते ४४ वर्ष - ६,३९,८२५ - ३,४०,३५०
४५ ते ५९ वर्ष - २,६७,०६० - १,८२,१७६
६० वर्षांवरील - २,०४,३३३ - १,४०,५७७
तीन लाख लोकांचे लसीकरणाकडे दुर्लक्ष
कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील सुमारे १५ लाख २८ हजार ०१५ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागामार्फत ठेवण्यात आले होते. त्यापैकी ११ लाख ८० हजार ७३१ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर उर्वरित ३ लाख ४१ हजार २८४ नागरिकांनी अजूनही लसीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे.
कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांनी लसीचा पहिला डोस घ्यावा. तसेच पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोसची मुदत संपत आली असे, अशा नागरिकांनीदेखील लसीचा दुसरा डोस घ्यावा. जेणेकरून कोविडच्या गंभीर लक्षणांपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल.
- डाॅ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला