१५७९ जणांनी दिले नमुने
अकाेला: महानगरपालिका प्रशासनव्दारे झोन निहाय सुरू असलेल्या तसेच बसव्दारे सुरू असलेल्या कोव्हीड-19 चाचणी केंद्रांव्दारे शहरातील एकुण १५७९ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये ३९३ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली असून ११८६ जणांनी रॅपिड ॲन्टीजेन चाचणी केली आहे. संबंधितांचे अहवाल मनपाने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
खाटांच्या माहितीसाठी मनपाची हेल्पलाईन
अकाेला: शहरामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना उपचारासाठी कोव्हीड केअर सेंटर व मान्यताप्राप्त हाॅस्पिटल येथे खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी महापालिका कार्यालय येथे २४ तास माहिती कक्ष (कोव्हीड-19 हेल्पलाईन कक्ष)आणि टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. याठिकाणी अकाेलेकरांनी संपर्क साधण्याचे आवाहन मनपा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
शहरात १५४ काेराेना पाॅझिटिव्ह
अकाेला: जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार बुधवारी महापालिका क्षेत्रातील १५४ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. यामध्ये पूर्व झोन अंतर्गत ७४, पश्चिम झोन अंतर्गत १५, उत्तर झोन अंतर्गत २० आणि दक्षिण झोन अंतर्गत ४५ असे एकुण १५४ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पाॅझिटिव्ह आहेत.
गांधी चाैकात खवय्यांची गर्दी
अकाेला: काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने व जिल्हा प्रशासनाने दिवसा जमावबंदी व सायंकाळी ७ नंतर संचारबंदी लागू केली आहे. शहरात काेराेना बाधितांची संख्या वाढत चालली असून रुग्णांना खाटा उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. अशास्थितीत बुधवारी गांधी चाैकातील चाैपाटीवर खवय्यांची गर्दी हाेती. याकडे मनपाच्या पथकांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून आले.
लॉकडाऊनवर फेरविचार करा!
अकाेला: कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे. त्यामुळे तातडीने या निर्बंधांबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी व संघटनेने केली. बुधवारी शहरातील व्यापारी संघटनांनी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावर शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे लाेकप्रतिनिधींनी सांगितले.
शासनाकडून जनतेची फसवणूक
अकाेला: कोरोनाच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता सर्वसामान्य जनता वैतागली आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने कठाेर निर्बंध शिथील करावेत,अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर, आ.गाेवर्धन शर्मा, महापौर अर्चना मसने, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली.