बोरगाव वैराळे: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत गावात तपासणी सुरू केली आहे. आशासेविका, अंगणवाडी सेविकामार्फत घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. येथे सुद्धा तपासणी सुरू आहे; मात्र ऑक्सिमीटर बंद असल्याने तपासणी निष्फळ ठरत आहे. ऑक्सिमीटर नादुरुस्त असल्याने तपासणी करूनही काय उपयोग, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. तपासणी अपयशी ठरत असल्याने येथे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्र्तविण्यात येत आहे.हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे येथे स्थानिक ग्रामपंचायतने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविक ांच्यामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आहेत का, याचे सर्वेक्षण होत आहे. तपासणीसाठी तापमापक यंत्र व ऑक्सिमीटर देण्यात आले आहेत; मात्र गावात ऑक्सिमीटर नादुरुस्त असल्याने विना ऑक्सिमीटरशिवाय तपासणी केली जात आहे. ही तपासणी निष्फळ ठरत असून, याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुर्लक्ष होत आहे. तपासणी केवळ कागदावरच होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतीशी संपर्क केला असता उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहे. तपासणी निष्फळ ठरत असून, गावात कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. गावागावात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा कार्यक्रम राबवून गावातील प्रत्येक व्यक्तीचे यंत्राद्वारे आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या आहेत. यामध्ये कामचुकारपणा होऊ नये, याची संपूर्ण जबाबदारी ग्रामसेवकाची आहे. बोरगाव वैराळे येथे ऑक्सिमीटर बंद पडले असेल, तर नवीन मीटर उपलब्ध करून पुन्हा आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना ग्रामसेवकास देण्यात येतील.-पुरूषोत्तम भुसारी, तहसीलदार, बाळापूर.