याेग दिनानिमित्त शिबिरांचे आयाेजन
अकाेला: दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यावर्षी योग दिनाचे औचित्य साधत जिल्हाभरात विविध ठिकाणी योग शिबिरांचे आयाेजन करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात कार्यक्रमांचे आयाेजन केले जात असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली.
रस्त्यावर सडका भाजीपाला
अकोला : शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या जठारपेठ चाैकात भाजीपाला विक्रेते सडका भाजीपाला रस्त्यालगत फेकत असल्याचे चित्र आहे़
याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष हाेत असून साफसफाई अभावी परिसरात प्रचंड घाण व कचरा साचल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पाेळा चाैकात अवैध नळ जोडणी
अकोला : शहराच्या विविध भागात अवैधरीत्या नळ जोडणी घेण्यात आली आहे. जुने शहरातील पाेळा चाैकात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरीत्या नळ जाेडणी घेऊन त्या माध्यमातून दिवसभर पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असतानाही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.
पंढरपुरच्या वारीसाठी परवानगी द्या !
अकोला : महाराष्ट्रातील असंख्य भक्तांचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई यांच्या दर्शनासाठी परवानगी देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ आमदार गाेवर्धन शर्मा यांनी केली आहे़ २० जुलै राेजी आषाढी एकादशी असून त्यानिमित्ताने वारकऱ्यांना काेराेना नियमांचे पालन करुन वारीसाठी परवानगी देण्याची मागणी आ़ शर्मा यांनी शासनाकडे केली आहे.
एलबीटी विभाग वाऱ्यावर
अकोला : नेहरू पार्क लगतच्या स्थानिक संस्था कर कार्यालयातून संगणकांची चाेरी झाल्याची घटना घडली हाेती. त्यावेळी स्थानिक संस्था कर विभागातील निरीक्षकाने स्थानिक सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली हाेती. त्यानंतरही याठिकाणी मनपाकडून सुरक्षा रक्षकाची तैनाती करण्यात आली नसल्याचे समाेर आले आहे. याठिकाणी रात्री असामाजिक तत्त्वांचा वावर लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज आहे.