अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २२ मध्ये आॅक्सिजन सिलिंडरची नळी लिकेज झाल्याची घटना शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी घडली. सिलिंडरचा स्फोट होईल, या भीतीने रुग्ण व नातेवाइकांची एकच तारांबळ उडाली होती. वॉर्डात उपस्थित कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली.सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २२ हा लहान मुलांचा राखीव वॉर्ड आहे. शुक्रवारी वॉर्डात नेहमीप्रमाणे बाल रुग्णांवर उपचार सुरू होता; मात्र सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वॉर्डात अचानक दुर्गंधी पसरली होती. दरम्यान, आॅक्सिजनच्या सिलिंडरची नळी लीक झाल्याची माहिती झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आॅक्सिजनच्या सिलिंडरचा स्फोट होईल, या भीतीने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी धावपळ सुरू केली. जीव वाचविण्यासाठी नातेवाइकांनी रुग्णांना घेऊन वॉर्डाबाहेर पळ काढला. त्यामुळे वॉर्डात एकच गोंधळ निर्माण झाला होता. येथील कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवित आॅक्सिजन सिलिंडरचा लिकेज बंद केला. कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात मोठी दुर्घटना टळली. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रुग्ण व नातेवाइकांनी सुटकेचा श्वास घेतला.शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वार्ड क्रमांक २२ मध्ये आॅक्सिजन सिलिंडर लीकेज झाल्याची घटना घडली होती. परंतु, कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वार्डामधील वातावरण शांत व सुरक्षीत आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी,अकोला