अकोला: सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वॉर्डाबाहेर एकाच ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर लावून नळ्यांद्वारे हे ऑक्सिजन थेट रुग्णांच्या खाटांपर्यंत पोहोचविण्यात येते, मात्र येथील वॉर्ड क्रमांक २७ जवळ ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यासाठी बांधलेले ओटे तुटल्याने अनेकदा ऑक्सिजन सिलिंडर चालू स्थितीतच खाली पडतात. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या नळ्या वारंवार तुटत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वोपचार रुग्णालयात काेरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. येथील बहुतांश वॉर्डमध्ये ऑक्सिजन पॉईंट देण्यात आले असून, वॉर्डाबाहेरून ऑक्सिजन सिलिंडरद्वारे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. हीच व्यवस्था येथील वॉर्ड क्रमांक २७ च्या बाहेर करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी ऑक्सिजनचे सिलिंडर ठेवण्यासाठी बांधलेले ओटे तुटलेल्या अवस्थेत असल्याने पॉईंटवर लावलेल्या सिलिंडरचा अनेकदा तोल जात असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे ऑक्सिजन पॉइंटवर लावलेली नळी तुटल्याने ऑक्सिजन लीक होण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हा प्रकार वारंवार घडत असल्याने येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका टाळण्यासाठी पॉईंटवर लावण्यात आलेले सिलिंडर ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या ओट्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.