अकोला: गत महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयातील ऑक्सिजनची मागणी ५० ते ६० टक्क्यांनी घटली आहे. तर दुसरीकडे जीएमसी, लेडी हार्डिंग्जसह मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकचा मार्ग मोकळा झाला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवला होता. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती होती. १ ते ७ सप्टेंबर दरम्यान ही कमी भरून काढण्यासाठी नागपूर, भुसावळ येथून ऑक्सिजन सिलिंडरची मागणी करण्यात आली होती; मात्र सप्टेंबरच्या अखेरीस रुग्णसंख्यावाढीचा वेग मंदावला. ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मागणीही कमी होत गेली. गत महिन्यात सर्वोपचार रुग्णालयात लहान आणि जम्बो मिळून जवळपास ६०० सिलिंडर, तर खासगी रुग्णालयात ३५० सिलिंडरची मागणी व्हायची; मात्र मागणी घटल्याने आता २५० पेक्षा जास्त सिलिंडर लागत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जीएमसीत ऑक्सिजन टँक निर्मितीला सुरुवात
सर्वोपचार रुग्णालयात प्रस्तावित १० केएल लिक्विड ऑक्सिजन टँकच्या निर्मितीला सुरुवात झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासाेबतच जिल्हा स्त्री रुग्णालय आणि मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रस्तावित १० केएल लिक्विड ऑक्सिजन टँकची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे ऑक्सिजनही मुबलक उपलब्ध आहे. गत महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात ऑक्सिजन सिलिंडरची मागणी ५० टक्क्यांनी घटली आहे.
- डॉ. स्वप्निल ठाकरे, ऑक्सिजन पुरवठादार, अकोला.
सध्यातरी ऑक्सिजनचा तुटवडा नाही. शिवाय, सर्वोपचार रुग्णालयासह लेडी हार्डिंग्ज आणि मूर्तिजापूर येथील ऑक्सिजन टँकचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आगामी काळातही ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला