नव्या वर्षात साधारणत: फेब्रुवारी महिन्यापासून कोविडच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. दुसऱ्या लाटेत जनुकीय बदल झालेल्या कोविड विषाणूचा संसर्ग झाल्याने अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर हाेती. त्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात दाखल बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू लागली होती. एप्रिल, मे महिन्यात गंभीर रुग्णांना खाटाही मिळणे कठीण होते. त्यामुळे सर्वाेपचार रुग्णालयात ऑक्सिजनचे दररोज सुमारे एक हजार सिलिंडर लागत होते. म्हणजेच सुमारे दहा केएल एवढ्या ऑक्सिजनची मागणी हाेती. मे महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला. रुग्णालयात दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांचे प्रमाणही कमी होऊ लागले. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयातील निम्म्यापेक्षा जास्त ऑक्सिजनच्या खाटा रिक्त झाल्या आहेत. परिणामी ऑक्सिजनची मागणी सुमारे ४० टक्क्यांनी घटली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हा बदल दिसून आला. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला ऑक्सिजनचे सुमारे ६०० जम्बो सिलिंडर लागत आहेत.
अशी आहे सर्वोपचार रुग्णालयातील स्थिती
एकूण खाटा - ४५६
ऑक्सिजन खाटा - ३००
ऑक्सिजन खाटांवर दाखल रुग्ण - २०६
नॉनकोविड रुग्णांचेही ऑक्सिजन सुरळीत
कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने कोविड रुग्णांसोबतच नॉनकोविड गंभीर रुग्णांनाही ऑक्सिजन मिळणे कठीण झाले होते. आता मात्र कोविडचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने कोविड रुग्णांची ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे नॉनकोविड रुग्णांच्या ऑक्सिजनचा प्रश्नही मिटला आहे.
ऑक्सिजन खाटांवरील गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सध्यातरी ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. मात्र, बॅकअप यंत्रणा नेहमीप्रमाणे सुरू आहे. परिणामी सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनची कमी भासत नाही.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला