अकोला: कोरोनाकाळात गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने सर्वोपचार रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेत सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याच्या तयारीला वेग आला होता. या अनुषंगाने दोन्ही रुग्णालयांत ऑक्सिजन टँक बसविण्यात आले, मात्र परवान्याच्या प्रतीक्षेत दोन्ही ठिकाणचे ऑक्सिजन प्लान्ट रखडल्याची माहिती आहे. कोरोनाकाळात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीनंतर सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अल्पावधीतच दोन्ही रुग्णालयात ऑक्सिजन टँकसह आवश्यक यंत्रणा कार्यान्वित केल्या. सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजन प्लान्टच्या परवान्यासाठी आवश्यक दस्तऐवज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले. कंत्राटदाराकडूनही पुढील कार्यवाही केली जात असली, तरी संंबंधित विभागाकडे परवान्याचे काम रखडल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. मध्यंतरी कोविड रुग्णांच्या संख्येत घट झाली होती, मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेता ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पाऊल उचलण्याची गरज आहे.
अतिगंभीर रुग्णांना होईल लाभ
प्राप्त माहितीनुसार, ऑक्सिजन प्लान्टसाठी ४८ लाख ९९ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला होता. याच निधीतून सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आला. ऑक्सिजन प्लान्टची क्षमता १० किलोलिटर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. त्याचा लाभ कोविडच्या रुग्णांसह इतर अतिगंभीर रुग्णांना होईल.
ऑक्सिजनची गरज वाढली
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. जिल्ह्यात आजघडीला ७०० पेक्षा जास्त कोविडचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये गंभीर रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. सर्वोपचार रुग्णालयात आजघडीला कोविड रुग्णांसोबतच इतर अतिगंभीर रुग्णांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे अशा रुग्णांच्या अनुषंगाने दररोज ६०० ऑक्सिजन सिलिंडरची मागणी असल्याची माहिती आहे.