लोकमत न्यूज नेटवर्क
अंदुरा : अंदुरा परिसरात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पेरणीनंतर पावसाची अत्यंत आवश्यकता असते; परंतु पावसाने ऐन मोक्याच्या क्षणी दगा दिल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या उलटण्याच्या मार्गावर आहेत. बागायतदार शेतकऱ्यांनी लावलेली मान्सूनपूर्व कपाशीसुद्धा कोमेजत चालली आहे, त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतातुर असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे लवकर आगमन झाले. मागील वर्षी अगोदर पावसाने दडी मारल्याने उत्पन्न घटले होते. तरीही उत्पादित झालेल्या पिकाला भाव मिळाले नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोलाने आपले धान्य मोजावे लागले. हे सर्व विसरून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागून शेतकऱ्यांनी पेरणी केली. यावर्षी सुरुवातीलाच पावसाने धमाकेदार एन्ट्री केली. त्या धमाकेदार पावसावर विश्वास ठेवून अंदुरा परिसरातील सोनाळा, बोरगाव (वै.), हातरुण, कारंजा (रम.), नया अंदुरा, हाता परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परिसरात पेरणीनंतर मागील सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने केलेली पेरणी उलटण्याच्या मार्गावर आहे. मान्सूनपूर्व कपाशीसुद्धा आॅक्सिजनवर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.पावसाने मागील सात दिवसांपासून दडी मारल्याने शेतातील पेरणी केलेल्या महागाईच्या बियाण्यावर वन्यप्राणी ताव मारत आहेत. दुसरीकडे विद्युत पुरवठा होत नसल्याने पिके कशी वाचवावी, या काळजीत शेतकरी पडला आहे. बागायतदार शेतकरी पिके वाचवण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करीत आहेत, असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पावसाचे आगमन झाले नाही, तर परिसरातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.