अकोला: जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीत उद्दिष्टाच्या केवळ २५.९७ टक्के लोकांनीच लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ९.१२ टक्के लोकांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. जिल्ह्यात लसीकरणाची हीच गती कायम राहिल्यास दोन्ही डोस मिळण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांमध्येही लसीचा दुसरा डोस घेण्यास उदासीनता दिसून येत आहे.
अद्याप पहिला डोसही मिळेना...
लसीचा पहिला डोस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केले, मात्र स्लॉट बुक होत नाही. लसीकरण केंद्रावर कूपनच्या माध्यमातून लस घेण्याचा प्रयत्न केला, तर कूपन देखील मिळाले नाही. त्यामुळे आतापर्यंत लसीचा एकही डोस मिळाला नाही.
- विशाल वंजारे, नागरिक
लसीकरण का वाढेना
लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर अनेकदा लसीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना लसीचा पहिला डोसही मिळाला नाही. दुसरीकडे लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांपैकी अनेकांनी लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय असली, तरी दुसरा डोस केवळ ९.१२ टक्के लोकांनीच घेतल्याचे दिसून येत आहे. लसीचा तुटवडा आणि दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये उदासीनता यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गुरुवारी एकाच केंद्रावर होणार लसीकरण
सद्यस्थितीत जिल्ह्यात लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे मोजक्याच केंद्रांवर लसीकरण होत आहे. गत आठवडाभरात सरासरी सहा केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली, मात्र लस उपलब्ध नसल्याने गुरुवारी एकाच केंद्रावर लसीकरण होणार आहे. जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहीम राबविताना आरोग्य यंत्रणेची मोठी कसरत होताना दिसून येत आहे.