अकाेला : गणेशाेत्सवासाठी अकाेला पाेलिसांनी ॲक्शन प्लाॅन केला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे़ यानुसार अकाेला पाेलिसांनी आतापर्यंत शांतता समितीच्या ४३ बैठका घेण्यात आल्या असून पाेलीस स्टेशन स्तरावरील पाेलीस मित्र यांच्या तब्बल ५५ बैठका घेऊन हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी तब्बल दाेन हजार पाेलिसांना १० दिवस रस्त्यावरच कडेकाेट बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे़ यासाेबतच गावखेड्यात एक गाव एक गणपती हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमात ग्रामस्थांनी माेठ्या प्रमाणात सहभागी हाेण्याचे आवाहन पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी केले आहे़
असा राहणार पाेलीस बंदाेबस्त
१० सप्टेंबर राेजी सुरू हाेणाऱ्या गणेशाेत्सवासाठी जिल्हा पोलीस दलातील ०१ अपर पोलीस अधीक्षक, ०२ उपविभागीय पोलीस अधिकारी,२० पोलीस निरीक्षक, ९५ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, १४०० पोलीस कर्मचारी, ५०० होमगार्ड्स तसेच पोलीस मुख्यालयातील ०४ आरसीपी प्लाटून, १ क्युआरटी प्लाटून, रिझर्व फोर्स तसेच राज्य राखीव पोलीस बलाची एक कंपनी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ हा बंदाेबस्त पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात काम करणार आहे़
८७२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
गणेश उत्सव दरम्यान जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कलम १०७ अन्वये ६४९, कलम १०९ अन्वये ०६, ११० अन्वये ३१ तर कलम ५५,५६,५७ अन्वये ०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ कलम १४४ अन्वये १५२ व कलम १४९ अन्वये २६ जणांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गणेशाेत्सवापूर्वी तब्बल ८७२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे़
६६ टाेळ्या हद्दपार ३७ जनांवर एमपीडीए
अकाेला पोलीस दलाकडून गुन्हेगारी वृत्तीचे एकूण ३७ ईसमांविरुध्द एमपीडीए ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे़ या आराेपींना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे़ तर एकूण ६६ गुन्हेगारी टोळ्यांना अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
दंगा काबू, रुट मार्च
पाेलीस स्टेशन स्तरावर या काळात गस्ती पथक तयार करण्यात आलेली आहे़ या पथकांकडून प्रत्येक गणेश मंडळावर वाॅच राहणार आहे़ तर शहरातील विविध भागात दंगा काबू नियंत्रणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे़ यासाेबतच शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन करण्यात आले आहे़