निर्भया बलात्कार प्रकरणानंतर अशा निर्जन स्थळांचा शोध घेऊन त्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले हाेते. अकाेला शहर व जिल्ह्यात २७ निर्जन स्थळे निश्चित करून पोलिसांनी त्यावर करडी नजर ठेवली आहे. जिल्ह्यातील निर्जन स्थळांवर लक्ष ठेवण्यासाठी निर्भया पथके नेमली असून, पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारीही अशा स्थळांवर नजर ठेवून आहेत़
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी तसेच निर्जन स्थळावरील गुन्हेगारी कारवाई कमी व्हाव्यात, या उद्देशाने निर्भया पथके सक्रिय आहेत. कोरोना महामारीत निर्भया पथकांच्या कामाला काहीसा ब्रेक लागला. आता ही पथके पुन्हा सक्रिय झाली आहेत.
जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना
वर्ष : बलात्कार - विनयभंग
२०१८ : ९२ १७८
२०१९ : ९४ १६५
२०२० : ८३ १५३
२०२१ : ६९ १३१
ही ठिकाणे धोक्याचीच!
येवता राेड : महामार्गानजीक व शहरापासून दूरवर हा परिसर असल्याने येथे गुन्हेगारांचा नेहमीच वावर दिसतो. विशेषत: हा भाग कमी लोकवस्तीचा असल्याने दिवसाही निर्जन असल्याने ते प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान मानले जाते. याचाच हे गुन्हेगार गैरफायदा उठवून गैरकृत्ये करतात.
महाण राेड : महाण राेड हा अंधारमय मार्ग व टेकडीचा परिसर असल्याने लोकवस्ती अद्याप विरळच आहे. त्यामुळे या परिसरात प्रेमीयुगुल जातात. मात्र, त्यांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. भीतीपाेटी पाेलीस तक्रार हाेत नसल्याचे वास्तव आहे.
जीपीएसमुळे गस्तीत सक्रियता
शहरातील निर्जन स्थळ तसेच मैदानांवर गस्तीसाठी विशेष वाहने असून, या वाहनांवर जीपीएस सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. वाहन गस्त घालत असताना १५ मिनिटांपेक्षा अधिक काळ एकाच जागेवर थांबलेले असेल तर लगेच ताे मेसेज नियंत्रण कक्षाला जाताे व वाहनाची तपासणी करण्यात येते. त्यामुळे गस्तीत अधिक सक्रियता आली आहे.