अकाेला : पोटाला दोन घास मिळावेत, यासाठी असलेली धडपड करताना लेकरांना शिक्षणाचा गंधही देऊ न शकणाऱ्या पालावरचे जीवन जगणाऱ्या कुटुंबातील चिमुकल्यांना आता अक्षरांची वाट मिळाली आहे़ दिवसभर मातीवर रेघोट्या ओढणाऱ्या हातात ‘सेव्ह बचपन’च्या पुढाकाराने लेखन-पाटी देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विकासापासून काेसाेदूर असलेल्या या समाजातील मुलांमध्ये शिक्षणाची गाेडी निर्माण हाेणार आहे़
राष्ट्रीय महामार्गावरील खडकी पुलाजवळ पाल टाकून वास्तव्यास अनेक कुटुंबे आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. येथे असंख्य लेकरे शिक्षणाशिवाय दिवसभर मातीत रेघोट्या मारत जगताना दिसतात. या लेकरांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांच्या हातात लेखन, पाटी देण्यासाठी ‘सेव्ह बचपन’ या संस्थेने पुढाकार घेतला़ संस्थेचे मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते अजय गावंडे यांच्या वाढिदवसानिमित्त पालावरील लेकरांना लेखन-पाटी, शैक्षणिक साहित्य, पोषक खाऊ वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सेव्ह बचपन येथील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी पुढाकार घेणार आहे. यावेळी येथील पालक व लेकरांनी मिळालेल्या शैक्षणिक साहित्याबद्दल आनंद व्यक्त केला. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शरद वानखडे, सिने कलावंत, लेखक किशोर बळी, प्रवीण लोडम, अजय गावंडे, चित्रपट दिग्दर्शक संघदास वानखडे, जागर फाउंडेशनचे संयोजक नंदकिशोर चिपडे, शेतकरी संघटनेचे विलास ताथोड, कवी राजू चिमणकर, ‘अकोल्याची जत्रा’चे संयोजक चंद्रकांत झटाले, ‘सेव्ह बचपन’चे जिल्हा समन्वयक तुलसीदास खिरोडकार, अकोला तालुका समन्वयक नरेंद्र चिमणकर व ‘सेव्ह बचपन’चे पदाधिकारी उपस्थित होते.
-------
शिक्षकाने भेट दिली मजुरीची कमाई
खरी कमाई करून श्रमाचे मोल समाजाला सांगणारे प्राथमिक शिक्षक संघदास वानखडे यांनी महिनाभर सिलिंडर वाहतूक करून मिळालेली रक्कम ‘सेव्ह बचपन’ या शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला भेट दिली. संस्थेच्या वतीने उघड्यावर जगणारे, वीटभट्टीवरील १००० लेकरांना पाट्या वाटपाचा संकल्प केला आहे.