अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात अकोला शहरातील शिवभक्त मंडळांच्यावतीने मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, हा प्रस्ताव तातडीने मार्गदर्शक सूचनांसाठी गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिवभक्त मंडळ प्रतिनिधींच्या बैठकीत जिल्हा प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आले. श्रावण महिन्यातील शेवटच्या श्रावण सोमवारी अकोला शहरात पालखी कावड महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी १४ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनासह पालखी व कावड मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यामध्ये पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पालखी कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवार, १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार तसेच पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह कावड पालखी सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भारती व शिवभक्त मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवभक्त मंडळांच्या
प्रतिनिधींनी मांडल्या सूचना!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून पालखी कावड महोत्सव कसा साजरा करता येइल, यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत प्रशासनासमोर सूचना मांडल्या. नियमांचे पालन करून पालखी कावड महोत्सव साजरा करण्याबाबत सूचनांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आला. हा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे तातडीने पाठविण्यात येणार असून, त्यावर मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत बैठकीत सांगण्यात आले.
तूर्त गेल्या वर्षीप्रमाणेच महाेत्सव
साजरा करण्यावर प्रशासन कायम !
पालखी कावड महोत्सव साजरा करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या सूचना मंडळांना तात्काळ कळविण्यात येणार आहेत. तूर्त, जिल्हा प्रशासन शिवभक्त मंडळांना कोणत्याही बाबतीत आश्वस्त करणार नाही. तथापि हा महोत्सव गेल्या वर्षी ज्या पद्धतीने साजरा झाला, त्या पद्धतीने साजरा व्हावा, यावर प्रशासन कायम आहे, असे प्रशासनामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी यावेळी स्पष्ट केले.
................फोटो...................