लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उ पजिल्हाधिकारी (आरडीसी) श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्या तील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत ७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांना देण्यात आला. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांची बैठक घेतली. पथके गठित करून, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून, अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी तहसीलदारांना दिले. या बैठकीला अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे, पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी, मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे यांच्यासह जिल्ह्यातील सातही तहसीलदार उपस्थित होते.
‘या’ पथकांमार्फत होणार पंचनामे!कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तालुका स्तरावर पथके गठित करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार संबंधित तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या पथकांमार्फत जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात येणार आहेत.
सहा हजारांवर शेतकर्यांच्या तक्रारी!बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाल्याबाबत जिल्ह्यात कृषी विभागामार्फत बाधित कापूस उत्पादक शेतकर्यांकडून तक्रार अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. ८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात सहा हजारांपेक्षा जास्त शे तकर्यांनी कापूस पिकाचे नुकसान झाल्याबाबतचे तक्रार अर्ज कृषी विभागाकडे सादर केले.
पालकमंत्री आज घेणार बैठक!गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात कपाशी पिकाचे झालेले नुकसान आणि कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्याच्या मुद्यावर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील शनिवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संबंधित विभागप्रमुख अधिकार्यांची बैठक घेणार आहेत. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.