अकोला : जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी नितीन टाले देशमुख व उपाध्यक्ष पदासाठी ज्योत्स्ना बहाळे यांना शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी मतदान करण्याचा आदेश (व्हीप) जारी करण्यात आला होता. परंतु पक्षादेशाचे पालन न करता मतदान केल्याने व पक्षादेशाचे उल्लंघन केल्याने, यासंदर्भात आपल्याविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत सात दिवसांत खुलासा सादर करण्याची नोटीस शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी चंद्रशेखर पांडे गुरुजी व माधुरी गावंडे यांना बजावली आहे. तसेच शिवसेना जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदावरून हटविले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी मतदान न करता तटस्थ राहिले. तसेच शिवसेनेच्या सदस्य माधुरी गावंडे यांनी भारिप-बमसंला मतदान केले. पांडे गुरूजी यांच्या जागी नितीन देशमुख यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेशही शिवसेना संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे. भाजप-सेनेसोबत काँग्रेसचा घरोबा कशासाठी? -भारिपने विचारला सवाल काँग्रेसच्या मुस्लीम नेत्यांनी भाजप-शिवसेना पुरस्कृत उमेदवार निवडून कसा येईल, याचाच विचार केला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे भाजप-शिवसेनेसोबत काय संबंध आहेत, हा घरोबा कशासाठी, मुस्लिम समाजाने काँग्रेसच्या मुस्लीम नेत्यांना सवाल विचारला पाहिजे, असा सल्ला भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे व माजी आमदार हरिदास भदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे. काँग्रेसकडून २९ जून रोजी सांगण्यात आले; परंतु ३0 जून रोजी पहाटेपर्यंत त्यांनी कुठलाही निर्णय कळविला नाही. व निवडणुकीत कॉंग्रेसने शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांना मतदान केले. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचे भाजप-सेनेशी काय संबंध आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पांडे गुरूजी यांना पदावरून हटविले
By admin | Published: July 01, 2016 2:12 AM