- सागर कुटे
अकोला : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नाही. या निर्णयाचा फटका वारकऱ्यांसह एसटी महामंडळालाही बसला आहे. पंढरपूर यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून अकोला विभागाला २०१९ साली ४७ लाख ३९ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. या उत्पन्नावर सलग दुसऱ्या वर्षी पाणी सोडावे लागणार आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षापासून एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. वारंवार लागणाऱ्या निर्बंधांमुळे बसेसचे उत्पन्न घटले असून, प्रवासीही मिळत नसल्याचे दिसून येते. आता अनलॉकमध्ये काही प्रमाणात फेऱ्या सुरू झाल्या आहे. त्यामुळे थोडे-फार उत्पन्न हाती लागत आहे. हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात, तर अधिक जण परिवहन महामंडळ, तसेच खासगी वाहनाद्वारे पंढरीची वाट धरतात. जे वारकरी पायी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते एसटीने वारी करतात. एसटी महामंडळाला यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते. कोरोना काळात सर्व यात्रा, उत्सव बंद आहे. परिणामी, या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे.
बसेस दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जायच्या २६५
त्यातून एसटीला उत्पन्न मिळायचे? ४७,३९,०००
प्रवासी एसटीतून दरवर्षी प्रवास करायचे? ३८,४३२
जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या
अकोला जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पालख्या पंढरपूर वारीला जातात. यामध्ये नाना उजवणे यांची पालखी, गजानन महाराज संस्थान बोरगाव, विठ्ठल रुखुमाई संस्थान सोमठाणा या पालख्यांचा समावेश आहे, तसेच संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव, वासुदेव महाराज श्रद्धासागर अकोट येथील पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. या पालख्यांसोबत हजारो वारकरी पायी वारी करतात.
यंदा एसटीने एकही पालखी नाही!
राज्यभरातून काही मानाच्या पालख्या एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला पोहोचणार आहेत, परंतु अकोला जिल्ह्यातून एकाही पालखीची निवड झाली नाही. त्यामुळे एसटी बसने एकही पालखी जाणार नसल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
वारकऱ्यांचेही गावी मन रमेना!
दरवर्षी पंढरपूरची वारी करत असतो. आतापर्यंत पंढरपूरच्या १९ वाऱ्या केल्या आहे, परंतु गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरपूर यात्राही रद्द करण्यात आल्याने वारी बंद आहे. यंदा घरूनच विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
- मधुकर राहुडकर
वारी हेच वारकऱ्याचे जीवन आहे. वारी नाही, तर आमचे जीवन शून्य आहे. सरकारच्या नियमांचे आम्ही स्वागत करतो. मात्र, पंढरपूरला जाता नाही आले, तरी शासनाने गावखेड्यातील विठ्ठलाचे एखादे मंदिर खुले करावे.
- काशिनाथ कर्णेवार
कोरोनाचाही फटका!
कोरोनाचाही मोठा फटका एसटीला सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही परिवहन सेवा सुमारे दोन ते अडीच महिने बंद होती. परिणामी, महामंडळाची आर्थिक स्थिती अधिकच खालावली आहे. आता आषाढी वारी रद्द झाल्याने लालपरी आर्थिक संकटात सापडणार आहे.