अकोला: जमिनीत अथवा पाण्यात असले तरी प्लास्टिक नष्ट होत नाही. प्लास्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. प्लास्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते. जमीन तसेच पाण्यातही ते हानिकारक ठरते. अशा घातक प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी चिमुकल्या मुलांनी पुढाकार घेतला आहे. परीक्षा आटोपल्यानंतर मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी राऊतवाडीतील चिमुकल्या मुलांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून कागदी पिशव्या व पाकिटे बनविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.प्लास्टिक पिशव्या पर्यावरणासाठीच नाही तर मनुष्य, प्राण्यांसाठीसुद्धा घातक आहेत. प्लास्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. प्लास्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. मानवाच्या कातडीला ते धोकादायक ठरू शकते. जमीन तसेच पाण्यातही ते हानिकारक ठरते. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये शासनाने ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर (वापर आणि विक्री) बंदी घातली आहे; परंतु बंदीचा कुणावरच परिणाम होत नाही. भाजीवाला, फळवाला, किराणा दुकान, खाद्य वस्तू विक्री दुकान, औषधे आदी सर्वच ठिकाणी पातळ व कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर करण्यात येत आहे. अशा घातक प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी चिमुकले मंडळी पुढे सरसावली आहेत. राऊतवाडीतील श्यामली वानखेडे, ओजस राऊत, पार्थ वानखडे, आर्या वानखेडे, अनू राऊत, रेणुका राऊत, वीर वानखडे या चिमुकल्यांच्या परीक्षा आटोपल्यानंतर, त्यांच्या शाळेला सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा सदुपयोग व्हावा आणि समाजात जनजागृतीसुद्धा व्हावी, यासाठी या चिमुकल्यांनी कागदी पिशव्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. प्लास्टिक पर्यावरण आणि मनुष्यासाठी घातक असल्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेशच या चिमुकल्यांनी दिला आहे. दररोज ४0 ते ५0 कागदी पिशव्या तयार करून ही चिमुकली मंडळी परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून देत आहेत. या चिमुकल्यांनी सुरू केलेला कागदी पिशव्या निर्मितीचा उद्योग परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. कोवळ्या मनाच्या मुलांना जे कळतं ते आम्हा मोठ्यांना का कळत नाही?