अकोला: मध्यवर्ती बसस्थानकाच्या निकासी प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पार्सल विभागाला वरती असलेल्या विश्रामगृहातील सांडपाण्याचा अभिषेक होत असल्याने पार्सल विभागातील कर्मचार्यांना तथा या ठिकाणी येणार्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बसस्थानकावरील स्वच्छता आणि सुव्यवस्थेकडे अधिकारी वर्ग सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरील पार्सल विभाग गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला आहे. पार्सल विभागाच्या वरच्या भागातच लांब पल्ल्याच्या गाड्यांवर चालक-वाहक म्हणून ड्यूटी करणार्या कर्मचार्यांसाठी विश्रामगृह आहे. या विश्रामगृहात आणि आजूबाजूला प्रचंड घाणीचे साम्राज्य असून, विश्रामगृहातील स्वच्छतागृहांचीदेखील दैनावस्था झाली आहे. स्वच्छतागृह आणि शौचालयातील घाण व सांडपाणी वाहून नेणार्या पाइपलाइन जागोजागी फुटलेल्या आहेत. या पाइपलाइन पार्सल विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत असल्याने त्यातून वाहणार्या सांडपाण्याचा ओघळ थेट प्रवेशद्वाराजवळ वाहतो. कंत्राटी तत्त्वावर पार्सल विभाग चालविणार्या अधिकार्यांनी या ठिकाणी दोन पाळय़ांमध्ये कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. २४ तास सुरू राहणार्या या विभागात बाहेरगावाहून येणार्या आणि पाठविल्या जाणार्या पार्सलची आवक- जावक सुरू असते. त्यामुळे दिवसभर नागरिकांचीदेखील वर्दळ असते. सांडपाण्यामुळे पार्सल खराब होऊ नये म्हणून बहुतांशप्रसंगी बाहेरच्या भागातच पार्सली ठेवाव्या लागतात. या स्थितीमुळे पार्सल गहाळ होण्याच्या अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहेत. स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पार्सल विभागातील कर्मचार्यांनी आगारप्रमुखांकडे तथा विभाग नियंत्रकांकडे वारंवार विनवण्या केल्या. मात्र, कुठल्याच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची माहिती येथील कर्मचार्यांनी ह्यलोकमतह्णला दिली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या स्वच्छतेचे कंत्राट दिले असले तरी, कंत्राटदार ती कामे चोखरीत्या करतो की नाही, याचा साधा मागमूस घेणे तर दूर, रापमचे अधिकारी या भागात फिरकतदेखील नसल्याची खंत कर्मचार्यांनी व्यक्त केली. रापमच्या अधिकार्यांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला असल्याचे स्पष्ट होत आहे.
पार्सल विभागाला विश्रामगृहातील सांडपाण्याचा अभिषेक!
By admin | Published: December 05, 2015 9:09 AM