अकोला: दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांंनी पुढील शिक्षणासाठी कंबर कसली आहे. अकरावीतील प्रवेशासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालक व विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. सर्व कागदपत्रे सेतु केंद्रावरून ऑनलाइन काढणे बंधनकारक करण्यात आले आहे; परंतु हीच सेवा डोकेदुखी ठरत आहे. दहावी व बारावीनंतर पालक आपला मुलगा किंवा मुलीला एखाद्या चांगल्या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खटाटोप करतात. त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावी, हे प्रत्येक पालकाचे ध्येय असते. ते पूर्ण करण्यासाठी पालक हिरिरीने प्रयत्न करतात. त्याअनुषंगाने मुलांना पुढील शिक्षणासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा, या हेतूने ते प्रयत्नरत असतात. त्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला, अधिवास, नॉन क्रिमी लेअर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्राची जुळवाजुळव केली जाते. याशिवाय बर्याच कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते; मात्र येथील तहसील कार्यालयांतर्गत येणार्या शासकीय व खासगी सेतु केंद्राच्या डोकेदुखीमुळे पालकांसह विद्यार्थ्यांंना तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे. तहसील कार्यालयातील सेतु केंद्रात लिंक वारंवार खंडित होत असल्यामुळे तासन्तास वाट पाहावी लागते. त्यामुळे पालक व विद्यार्थी हैराण झाले आहेत. अशातच सेतु केंद्रावरील वाढती गर्दी पाहून सेतु केंद्रचालकांनी नको असलेले प्रमाणपत्र देऊन व वाजवीपेक्षा जादा पैसे उकळत असल्याचे आरोप होत आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कागदपत्रे मिळविण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे पालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
मुलांसाठी पालकांची धावाधाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 1:52 AM