अतुल जयस्वाल, अकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई)अंतर्गत विनाअनुदानीत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे खोडा निर्माण झाल्याने पालकांची चिंता वाढली असतानाच प्राथमिक शिक्षण संचालनालयाने निवड झालेल्या बालकांना शाळा प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्याचे मंगळवार, १८ एप्रिल रोजी जाहीर केले. त्यामुळे २५ एप्रिल ही प्रवेशासाठीची अंतिम मुदत असेल असे वाढवून मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
आरटीई अंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील राखीव २५ टक्के जागांसाठी राज्यभरात १ मार्च ते २५ मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर ५ एप्रिल रोजी सोडत काढण्यात येऊन १२ एप्रिल रोजी निवड यादी जाहिर करण्यात आली. निवड झालेल्या बालकांच्या पालकांना मेसेजही धाडण्यात आले. तसेच १३ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून आपल्या पालकांचा प्रवेश निश्चित करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. तथापी, सद्यस्थितीत आरटीई प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. प्रवेशासाठीची २५ एप्रिल ही अंतीम मुदत जवळ आल्याने पालकांमध्ये चिंता व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण संचालक (प्राथमिक)शरद गोसावी यांनी १८ एप्रिल रोजी अधिसूचना काढून आरटीई सोडतीत निवड झालेल्या बालकांना शाळा प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल, असे आश्वस्त केले आहे.