- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: शाळेला एप्रिल-मेमध्ये सुटी. एवढा मोठा कालावधी कसा घालवायचा, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत नाही; पण त्यांच्या पालकांना मात्र निश्चितच पडतो. मग पालक वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरांचा शोध घेतात. सध्या शहरात गल्लोगल्ली उन्हाळी छंद व क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र पालकांनी आपल्या पाल्यांना सुट्यांचे योग्य नियोजन करू न दिल्यास त्यांच्या उन्हाळी सुट्या खऱ्या अर्थाने सार्थकी ठरतील.वर्षभर शाळा, गृहपाठ, परीक्षा, शिकवणी, वेगवेगळे शैक्षणिक अभ्यासक्रमाचे वर्ग, विविध स्पर्धा परीक्षा, शाळेने आवश्यक केलेले खेळ, नृत्य स्पर्धा अशी हल्ली विद्यार्थ्यांची दैनंदिनी. खरंतर या सर्वांचा कंटाळा मुलांना आलेला असतो; परंतु आपली मुले ‘मल्टी टॅलेन्टेड’ दिसावी म्हणून पालक जबरदस्तीने मुलांना विविध शिबिरात घालतात. महागड्या शिबिरात टाकतात. पालकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन आज शेकडोच्यावर प्रशिक्षण शिबिरांचा भाव वधारलेला आहे.स्केटिंग, क्रिकेट, बॅडमिंटन आदी ग्लॅमरस खेळ, शिबिराकडे विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचा जास्त कल असतो. या शिबिरांचा भावदेखील जास्त असतो. साधारणपणे पाचशे ते दोन-तीन हजार रुपयांपर्यंत रक्कम या शिबिरांसाठी भरावी लागते. याच धर्तीवर चित्रकला, कॅलिग्राफी, पेन्टिंग, नृत्य, बेसिक मॅथ्स, पर्सनालिटी डेव्हलपमेंट आदी छंद वर्गाचेदेखील असेच वधारलेले भाव आहेत. उन्हाळी छंद व खेळ प्रशिक्षण शिबिराच्या गोंडस नावाखाली एक व्यवसायच बनलेला आहे. या शिबिरात गेल्यानंतरही ग्रेडपासून विद्यार्थ्यांची सुटका नाही. विद्यार्थी शिबिर कशा रीतीने यशस्वी करतो, त्यानुसार विद्यार्थ्यांना ग्रेड प्रमाणपत्र देण्यात येते. ग्रेड मिळविण्यासाठी मग परत मुले एकमेकांशी स्पर्धा करतात. यामुळे मुलांची मानसिक कुचंबणा होते. व्यक्तिमत्त्व विकासाकरिता किंवा एखादी कला, क्रीडा आत्मसात करण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करावी लागते. मग अवघ्या १५ दिवस ते एक महिन्याच्या कलावधीत शिबिरांमधून मुले तयार होतात का, तर निश्चितच नाही. मुले सुट्यांमध्ये निष्क्रिय न राहता सक्रिय राहिले पाहिजेत, यासाठी महागड्या शिबिरांची नाही, तर बौद्धिक क्षमतेसोबतच मानसिक क्षमता कशी वाढेल, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.पुस्तकातील जग प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी मानसशास्त्र आणि विज्ञानाच्या आधारावर शासनाने एवढ्या मोठ्या कालावधीची सुटी निश्चित केलेली आहे. सुट्यांचा आनंद चिमुकल्यांना मनसोक्त घेऊ द्या.- अॅड़ सुनीता कपिले,सदस्य, बालकल्याण समिती.
अशी घालविता येईल सुटी
- गोष्टींचे पुस्तके वाचण्यास दिल्याने ज्ञानाच्या कक्षा रुदांवतील.
- बौद्धिक खेळ खेळण्यास दिल्याने एकाग्रता वाढेल.
- पहाटे फिरायला नेल्यास निसर्ग वाचता येईल.
- खाद्यपदार्थ बनविण्यास शिकवावे.
- स्वयं शिस्तीसाठी घरातील छोटी कामे शिकवावी.
- घरच्याघरी व्यायाम, प्राणायाम, योगा शिकवावे.
- मनसोक्त खेळू द्यावे.