जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात कोरोनाने थैमान घातले असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील काही भागात १० वर्षा खाली मुलांनाही कोराेनाची लागण झाल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी देखील कोरोनाचा धोका वाढत आहे. गत मार्च महिन्यात जिल्ह्यातील कोविड बाधित रुग्णांमध्ये केवळ एका बालकाचा समावेश असला, तरी अनेक बालकांमध्ये कोरोनाचे लक्षणे आढळून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास बालकांना सर्वांपासून वेगळे ठेवण्याची वेळ येईल या भीतीपोटी पालकही बालकांच्या कोविड चाचणीला टाळत असल्याचे चित्र दिसून आले. ही स्थिती पाहता बालकांनाही कोरोनाचा धोका कायम असून पालकांनी आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे.
काय आहेत लक्षणे
अनेक बालकांना सर्दी, ताप, खोकला, हगवण लागणे आदि लक्षणे आढळून येतात. बालकांमध्ये ही लक्षणे आढळताच पालकांनी त्यांना तत्काळ बाल रोग तज्ज्ञांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते बालकांमधील या समस्या नेहमीच्याच औषधांनीच सुटत असल्याने पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र या लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
तर ‘कावासाकी’ आजाराचाही धोका
कुटुंबात कुणाला कोरोना होऊन गेल्यानंतर लहान बालकांमध्ये गोवरची लक्षणे आढळल्यास, किंवा अंगावर चट्टे येणे, तोंड येणे, डोळे येणे आदि लक्षणे आढळल्यास बालकांना कावासाकी हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पालकांनी तात्काळ बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
त्रिसुत्रीचे पालन करणे शिकवा
लहान मुलांना कोरोनासह इतर विषाणूजन्य आजारापासून बचावासाठी त्रिसुत्रीचे पालन करण्याचे मार्गदर्शन पालकांनी करावे. यामध्ये प्रामुख्याने मास्क कसा घालावा, इतरांपासून सुरक्षित अंतर कसे राखावे तसेच वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे आदिंचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, त्याचा परिणाम लहान बालकांवरही होत आहे. अनेक बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकल्यासह हगवण लागण्याची लक्षणे आली आहेत, मात्र पालकांनी यामुळे घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याची गरज आहे. असे लक्षणे दिसताच बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच घरात कुणाला कोरोना होऊन गेल्यावर बालकांमध्ये गोवर, तोंड येणे, डोळे येणे आदी लक्षणे आढळल्यास कावासाकी या आजाराचा धोका असून शकतो. त्यामुळे विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.
- डॉ. अनुप चौधरी,