अकाेला : शहरात नागरिकांना त्यांची वाहने ठेवण्यासाठी मनपाकडून वाहनतळाची (पार्किंग) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी मनपाच्या जागा पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने पार्किंगसाठी फेरनिविदा राबविली जाणार असल्याची माहिती आहे.
शहरात महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या खुल्या जागांवर पार्किंगची व्यवस्था उभारण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. आज रोजी पार्किंग स्थळाच्या जागांवर अतिक्रमण थाटण्यात आल्याचे चित्र आहे. वाहनतळांच्या जागा भाडेतत्त्वावर दिल्यास महापालिकेला माेठा आर्थिक महसूल प्राप्त हाेताे. यापूर्वी मनपा प्रशासनाने संबंधित जागा भाडेतत्त्वावर दिल्या असता कंत्राटदारांकडून नियमांचे उल्लंघन हाेत असल्याचे समाेर आले. वाहनांच्या सुविधेसाठी दिलेल्या जागा कंत्राटदारांनी लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांना उपलब्ध करून दिल्या. त्या बदल्यात संबंधित अतिक्रमणधारकांकडून माेठी आर्थिक रक्कम वसूल केली जात हाेती. या प्रकारामुळे वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यालगत दुचाकी किंवा चारचाकी वाहने उभी करावी लागत असल्याचे दिसून येते. ही परिस्थिती लक्षात घेता मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी पार्किंगची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील १३ जागा निश्चित करण्यात आल्या असून, निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेत पुन्हा फेरबदल करण्यात आला आहे.
जागेचा कालावधी वाढवला!
मनपा प्रशासनाने शहराच्या मुख्य भागातील एकूण १३ जागा पार्किंगसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेत सदर जागा एक वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्याची अट नमूद होती. परंतु मनपाने जागेचे आकारलेले एकूण भाडे व निविदेतील विविध अटी व शर्ती लक्षात घेता एक वर्षाच्या कालावधीसाठी ही निविदा परवडणारी नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर सदर जागेचा कालावधी पाच वर्षांचा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे.
वाहने ठेवण्यासाठी तास निश्चित करणार
पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी व चार चाकी वाहने ठेवण्यासाठी प्रशासनाने दर निश्चित केले होते. परंतु ही वाहने नेमक्या किती तासांपर्यंत ठेवल्यास शुल्क वसूल करायचे याबद्दल निविदेत स्पष्ट उल्लेख नव्हता. दोन तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी वाहन ठेवल्यास किती शुल्क आकारायचे? ही बाब अस्पष्ट होती. त्यामुळे आता फेरनिविदेमध्ये वाहने ठेवण्यासाठी तास निश्चित केले जाणार असून, तासाप्रमाणे शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती आहे.