‘अमृत’अभियानअंतर्गत शहरात जलवाहिनीच्या वितरण प्रणालीत सुधारणा केली जात असून या कामाचे कंत्राट ‘एपी ॲन्ड जीपी’एजन्सीकडे साेपविण्यात आले आहे. मागील ३२ महिन्यांपासून सुरू असलेले पाणीपुरवठा याेजनेचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. बहुतांश भागातील कामे अपूर्ण असली तरीही कंत्राटदाराच्या थकीत देयकासाठी महापालिका आयुक्त निमा अराेरा यांच्यावर दबावतंत्राचा वापर करण्यात आला. या दबावाला झुगारत कामांची तपासणी करूनच देयक अदा केल्या जाणार असल्याचे आयुक्तांनी ठणकावून सांगितल्याची माहिती आहे.
महान धरण ते अकाेला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे तसेच शहरातील अंतर्गत जलवाहिनीचे जाळे बदलून नवीन आठ जलकुंभ उभारण्याच्या कामाला २०१७ मध्ये प्रारंभ करण्यात आला हाेता. यासाठी शासनाने ११० काेटी मंजूर केले हाेते. यातून मनपाने ८७ काेटींची निविदा मंजूर केली हाेती. या कामासाठी ‘एपी ॲन्ड जीपी’असाेसिएट्सची नियुक्ती करण्यात आली. दाेन वर्षांच्या कालावधीत ही कामे पूर्ण करणे अपेक्षित हाेते. तसे न झाल्यामुळे एजन्सीला वेळाेवेळी सात महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून ही मुदत ३१ मार्च २०२१ राेजी संपुष्टात आली आहे. ‘अमृत’अभियानच्या कामावर तांत्रिक सल्लागार म्हणून शासनाने मजिप्राची निवड केली. मजिप्राने एजन्सीच्या कामावर लक्ष ठेवणे भाग आहे. तसे हाेत नसल्यामुळे एजन्सीने शहरात मनमानीरीत्या खाेदकाम करून अवघ्या दीड ते दाेन फीट अंतरावर जलवाहिनीचे जाळे टाकल्याची परिस्थिती आहे. आजवर पाणीपुरवठा वितरण प्रणालीची कामे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाली असून उर्वरित कामे तातडीने निकाली काढणे अपेक्षित असताना एजन्सीने साेयीनुसार भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम, उत्तर झाेनमध्ये पाण्याची समस्या !
एजन्सीने बहुतांश भागात जलवाहिनीचे जाळे टाकले असले तरीही जलकुंभांपर्यंत व नागरिकांच्या घरापर्यंत पाेहाेचणाऱ्या जलवाहिनीला जाेडणी केली नसल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम व उत्तर झाेनमधील भागाचा समावेश हाेताे. या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
महापाैरांच्या बैठकीत पितळ उघडे!
जुने शहरातील बहुतांश भागात जलवाहिनीची कामे अपूर्ण स्थितीत आहेत. ही बाब महापाैर अर्चना मसने यांनी ५ एप्रिल राेजी जलप्रदाय विभागाचा आढावा घेतला असता उजेडात आली हाेती. एजन्सीकडून शेवटच्या टप्प्यातील कामे निकाली काढण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याबद्दल महापाैर मसने यांनी नाराजी व्यक्त केली हाेती, हे विशेष.