बुलडाणा : ग्रामीण भागासह शहरी भागात मोठय़ा प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. त्यातील परागकण म्हणजे पार्थिनीयममुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पार्थिनीयमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विविध आजारांसह खाज सुटणे आदी असह्य वेदना होत आहेत त्यामुळे वेदनाग्रस् तांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. या पार्थिनीयमचा धोका त्वचा रोग, मधुमेह झालेल्या व्यक्तींना मोठय़ा प्रमाणात झाला असून, अनेकांचे जीवन धोक्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी साफसफाई करणे आवश्यक असते; मात्र अनेक ठिकाणी पालिका प्रशासन किंवा संबंधित ग्रामपंचायत प्रशासन साफसफाईकडे दुर्लक्ष करताना दिसून येते. यामुळे गाव परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच आता ठिकठिकाणी गाजर गवताने आपले डोके वर काढल्यामुळे गाव परिसराला पार्थिनीयमचा (गाजर गवतातील परागकण) धोका निर्माण झाला आहे. अनेक नागरिक विविध त्वचा रोगाने त्रस्त झाले असून, गाजर गवतामुळे निर्माण होणार्या पार्थिनीयमच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. राज्यात अनेक भागात मागील आठवड्यात दमदार पाऊस झाला; मात्र संबंधित प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी साफसफाई न केल्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे ढीग जमा झाले आहेत. दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्गंंधी पसरली आहे. तर काही ठिकाणी अंतर्गत रस्त्यावरील खड्डय़ात घाणीचे पाणी साचून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
** बुलडाण्यात रुग्ण वाढले
बुलडाणा शहरात पावसाळ्यापूर्वी स्वच्छता अभियान राबविण्यात न आल्यामुळे अनेक वॉर्डात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही वॉर्डात नाल्या साफ करण्यात आल्या; परंतु घाण बाहेर तशीच ठेवण्यात आली. काही दिवसांनी सदर घाण नाल्यात पडल्याने पुन्हा घाणीने नाल्या तुडुंब भरल्या. त्यामुळे अनेक वॉर्डात दुर्गंंधी पसरली आहे. त्यातच गाजर गवताने डोके वर काढण्यामुळे अनेक कुटुंबीयातील सदस्यांना विविध आजाराने ग्रासले आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.