अकोला : जिल्ह्यात निर्बंध शिथिल होत असल्याने एसटीच्या फेऱ्यांची संख्याही वाढत आहे. प्रत्येक दिवसाला लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या वाढविण्यात येत आहे. सद्यस्थितीत शहरातील आगारातून २२ बसेस सोडण्यात येत असून, ९५०० किमी धावत आहेत. या फेऱ्यांमधून आगाराला २ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे.कोरोनामुळे एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात सापडले आहे. दीड वर्षामध्ये एसटीची प्रवासी वाहतूक कधी बंद तर कधी सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कडक निर्बंध असल्याने १३ दिवस एसटीच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी पुन्हा फेऱ्या सुरू करण्यात आल्या. आता निर्बंध शिथिल होत असल्याने बसेसच्या फेऱ्यांची संख्याही वाढली आहे. दररोज जिल्ह्याबाहेरील फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून, उत्पन्नात वाढ झाली आहे. सद्यस्थितीत दररोज २२ बसेस सुरू आहे. या बसेस ९५०० हजार किमी धावत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
नाशिक, धुळे बसफेरी सुरू
लांब पल्ल्यांच्या बसेसची संख्या वाढविण्यात येत आहे. यामध्ये नुकतीच नाशिक व धुळे बसफेरी सुरू करण्यात आली आहे, तर अमरावती, यवतमाळ व जळगाव खान्देश नियमित फेरी सुरू आहे.