दहीहंडा: अकोला तालुक्यातील दहीहंडा येथील प्रवासी निवाऱ्याची गत अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, प्रवाशांसह ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
दहीहंडा अकोला तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले गाव असून, लोकसंख्या अंदाजे १२ ते १४ हजारांपर्यंत आहे. दहीहंडा बसथांब्यावरून बाहेरगावाहून ये-जा करण्यासाठी नेहमी वर्दळ असते. दहीहंडा येथून अकोला-दर्यापूर, चोहोट्टा बाजार-अकोट, कुटासा-जैनपूर-पिंपळोद व इतर ठिकाणाला वाहने धावतात. त्यामुळे येथील बसथांब्यावर नेहमीच गर्दी असते. बसथांब्याची दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांना रस्त्याच्या बाजूलाच ताटकळत उभे राहावे लागते. या निवाऱ्यावरील काही सिमेंटचे पत्रे गायब झाले आहेत. तसेच ओटा खचून जमीनदोस्त झाला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-----------------------
प्रवासी निवाऱ्याभोवती घाणीचे साम्राज्य
दहीहंडा येथे प्रवाशांची संख्या मोठी असल्याने प्रवासी निवाऱ्यात गर्दी असते. प्रवासी निवाऱ्याभोवती घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात कचरा पसरला असून, पाण्याची डबके साचली आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून, प्रवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
----------
दहीहंडा येथे मोठी बाजारपेठ
दहीहंडा येथे बाजारपेठ असल्याने गावात येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने बसथांब्यावर नेहमी वर्दळ असते. पावसाळ्यात व उन्हाळ्यात प्रवाशांना हॉटेल व इतर दुकानांचा साहारा घ्यावा लागतो. काही प्रवासी रस्त्याच्या कडेला उभे असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.