लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, यासाठी महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेने १७ ऑक्टोबरपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या इशार्याकडे राज्याने लक्ष न दिल्याने सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच कामगारांनी संप सुरू केला. रात्री उशिराने अकोला डेपोच्या गाड्या आल्या. त्या पुढे गेल्या नाहीत. इतर डेपोच्या गाड्या मात्र रात्रीच रवाना झाल्यात. सकाळपासून अकोला डेपो-१ आणि २ च्या चालक-वाहकांनी चक्काजाम सुरू केला. त्यामुळे सणाच्या तोंडावर हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत. अकोला डेपो १ मधील ४५ आणि डेपो २ मधील जवळपास ७0 गाड्या अकोल्यातच अडकल्यात. त्यामुळे डेपो एकचे ४ लाखांचे आणि डेपो दोनचे ८ लाखांचे नुकसान झाले. दिवाळीनिमित्त घराकडे निघालेल्या प्रवाशांची झालेली कोंडी पाहून खासगी लक्झरीचालकांनी, अक्षरश: लूट केली, त्यामुळे प्रवाशांना मागणार तेवढे भाडे द्यावे लागले.
पारस-अकोला-अकोट-अकोला एकमेव गाडी धावली अकोला डेपो क्रमांक दोनची एमएच ४0-८८३४ क्रमांकाची बसगाडी मंगळवारी पारस-अकोला, अकोला-अकोट आणि अकोट-अकोला अशी धावली. या गाडीला प्रवाशांनीदेखील प्रतिसाद दिला. या गाडीवर शिवसेनाप्रणीत कामगार सेनेचे उपाध्यक्ष पुंडलिक भोंगे हे चालक होते. या आंदोलनास त्यांचा व्यक्तीशा पाठिंबा नसल्याने, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी २५ प्रवाशांना सेवा दिली. भोंगे यांच्या या हिमतीचे कौतुक करीत आरटीओ अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेच्यावतीने त्यांचा येथे सत्कार करण्यात आला. अकोट येथे माजी आमदार संजय गावंडे यांनीही सत्कार केला. याप्रसंगी डेपो सचिव देवीदास बोदडे, आगार प्रमुख ए.पी. पिसोडे, जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवशाही अडकली. तीन गाड्या रवानालांब पट्टय़ाच्या तीन बसगाड्या अकोल्यातून रवाना झाल्यात. त्यामध्ये नागपूर-पुणे, पुणे-नागपूर आणि दुसरी एक नागपूर-पुणे रवाना झाली; मात्र शिवशाही अकोला-पुणे मात्र अकोल्यातच अडकली. मंगळवारी रात्री ८ वाजता ही गाडी रवाना होणार होती; मात्र ती अकोल्यातून निघू शकली नाही.
खा. संजय धोत्रे, आ. सावरकरांची धावअकोला डेपो क्रमांक दोनवर काही प्रवासी अडकले असल्याची माहिती खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांना मिळाली. त्यांनी लगेच बसस्थानकावर धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. एसटी कामगारांच्या संपकरी पदाधिकार्यांशी चर्चा करून नागरिकांची कोंडी सोडविण्याचे आवाहन केले. कामगारांच्या मागण्या रास्त असून, याबाबत नेत्यांशी चर्चा केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिलेत.