लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउनसह संचारबंदी लागू केली. त्याची अंमलबजावणी करताना कमालीची शिथिलता असल्याने जिल्ह्यात २५ मार्च ते २ मे दरम्यान तब्बल २१,३०५ प्रवाशांनी धाव घेतली. त्यापैकी ८५ प्रवासी शुक्रवारी तर ११७ शनिवारी दाखल झाले. प्रवाशांची ही दैनंदिन संख्या पाहता त्यांची माहिती काढणे, तपासणी करणे, ही कामे करताना ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कमालीची हैराण झाली आहे. जिल्ह्याच्या सीमांवर पथके तैनात असताना प्रवासी येतात तरी कसे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउननंतरही जिल्ह्यात प्रवाशांचा ओघ सुरूच असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा बोजवारा उडत आहे. २५ मार्चपासून दैनंदिन प्रवासी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामध्ये २५ एप्रिल रोजी जिल्ह्यात १११ प्रवासी आले होते. त्यानंतर २८ एप्रिल रोजी आणखी ९६ प्रवासी विविध गावांमध्ये दाखल झाले. त्यानंतर १ मे रोजी ८५, २ मे रोजी ११७ प्रवासी आले आहेत. त्यांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
आतापर्यंत आलेल्या प्रवाशांपैकी पुढील उपचाराची गरज असलेल्या तसेच संदिग्ध म्हणून २२९ व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. बाहेरच्या जिल्ह्यातून दाखल झाल्याने घरातच ‘क्वारंटीन’ केलेल्या सर्व प्रवाशांची संख्या २ मेपर्यंत २१,३०५ आहे. त्यापैकी २०,३१३ प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी समाप्त झाला आहे. आता ९९२ प्रवासी ‘क्वारंटीन’ आहेत. ‘क्वारंटीन’ केलेल्या प्रवाशांची संख्याही दैनंदिन वाढतीच आहे. त्यामुळे त्यांचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत कोरोना प्रसाराचा धोका कायम आहे.
२ मे रोजी दाखल झालेले प्रवासीप्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा-०२, पळसो-०१, कुरणखेड-१०, कापशी-०७, कावसा-०६, उरळ-१२, पारस-०२, हातरूण-०३, धाबा-०८, कान्हेरी सरप-१७, महान-१६, पिंजर-०५, अडगाव-२, कुरूम-३८, धोत्रा-०६, पारद-०९, जामठी-१०, पातूर-२८, बाभूळगाव-८ प्रवासी दाखल झाले आहेत.