- सचिन राऊत
अकोला : विदेशात जाण्यासाठी असलेला पासपोर्ट (पारपत्र) काढताना अर्जदारांची पडताळणी करण्यासाठी गोपनीय शाखेच्या पोलिसांनी पडताळणीच्या वेळी संबंधित अर्जदाराच्या रहिवासी पत्त्यावर जाऊन पडताळणी करणे बंधनकारक आहे; मात्र जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गोपनीय शाखेच्या पोलिसांनीपासपोर्टसाठी रहिवासी पत्त्यावर न जाता पोलीस ठाण्यात बोलावूनच पडताळणी वर्षानुवर्षापासून सुरू ठेवल्याचे वास्तव आहे. त्यामुळे एम पासपोर्ट योजनेला पोलिसांचाच कोलदांडा असल्याचे स्पष्ट होत आहे.शहरासह जिल्ह्यातील नागरिक पासपोर्ट काढण्यासाठी अकोल्यातच झालेल्या कार्यालयात अर्ज सादर करतात. त्यानंतर या अर्जावर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच चारित्र्य पडताळणीसाठी पासपोर्ट कार्यालयाद्वारेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत अर्जदाराचे दस्तावेज आॅनलाइन पाठविण्यात येतात. त्यानंतर या शाखेतून अर्जदार ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे त्या संबंधित पोलीस ठाण्यात पडताळणीसाठी हा अर्ज आॅनलाइन पाठविण्यात येतो. अर्जदारांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात गोपनीय शाखा कार्यरत असून, येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी नियमानुसार अर्जदाराच्या घरी जाऊन पडताळणी करावी तसेच अर्जदार त्या पत्त्यावर राहतो का नाही, याचीही पडताळणी करण्याची जबाबदारी गोपनीय शाखेच्या कर्मचाºयांची आहे. तसेच अर्जदाराच्या घरासमोरच त्याचे छायाचित्र घेऊन ते आॅनलाइन सादर करण्याचीही सोय या शाखेच्या कर्मचाºयांना करून देण्यात आलेली आहे; मात्र जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना बोलावण्यात येत असल्याचे वास्तव आहे. यावरून गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी कामात हलगर्जी करीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या बाबींची होते पडताळणीअर्जदार देत असलेल्या पत्त्यावर राहतो की नाही, याची पडताळणी केल्यानंतर त्याच्या घरासमोरच छायाचित्र घेण्यासाठी गोपनीय शाखेला एक आयपॅड देण्यात आलेला आहे. या ठिकाणी छायाचित्र घेतल्यानंतर आधार कार्ड किंवा दुसरा रहिवासी पुरावा याच ठिकाणावर स्कॅन करणे गरजेचे आहे. त्यानंतर ही पडताळणी आॅनलाइन सादर केल्यानंतर त्याची एक प्रत अर्जदाराला तर दुसरी प्रत गोपनीय शाखेत ठेवण्यात येते. आयपॅडवर चढली धूळगोपनीय शाखेच्या पोलीस कर्मचाºयांच्या अडचणी लक्षात घेता त्यांना आयपॅड देण्यात आले. आयपॅडमध्ये नेट सुविधेसह पासपोर्ट पडताळणीची वेबसाइट आणि अॅपही देण्यात आले आहे. त्यामुळे पडताळणी आणि इतर प्रक्रिया तातडीने होण्यास मदत होते; मात्र अद्यापही बहुतांश पोलीस आॅयपॅडचा वापर करीत नसल्याचे त्यावर धूळ चढली आहे.