अकोला: अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन मार्गावरून जाताना अकोलेकरांची पाचावर धारण बसत आहे. रस्त्याच्या मधोमध उड्डाणपुलाचे काम सुरू असून, खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून गतवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती केली होती. आजरोजी रस्त्यावरील खड्डे लक्षात घेता डांबराच्या ‘मापात पाप’ झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि मुख्य रस्ता अशी ओळख असलेल्या अशोक वाटिका ते रल्वे स्टेशन मार्गावर उड्डाणपुलाच्या खोदकामाला प्रारंभ झाला आहे. खदान पोलीस स्टेशन चौकापासून या कामाला सुरुवात करण्यात आली. सद्यस्थितीत जेल चौक, अशोक वाटिका चौक, मुख्य पोस्ट आॅफिस तसेच टॉवर चौक, एसीसी मैदान आदी ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून बॅरिकेड लावण्यात आले आहेत. रस्ता अरुंद झाल्यामुळे त्यातून वाट काढताना सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडत आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, अशोक वाटिका चौक ते थेट रेल्वे स्टेशनपर्यंत या डांबरी रस्त्याची चाळण झाल्याचे केविलवाणे चित्र पाहावयास मिळत आहे. अरुंद रस्ता आणि त्यात खड्ड्यांची भर, यातून वाट काढताना वाहनधारक त्रस्त झाले आहेत.अभियंत्यांचे कंत्राटदारांसोबत साटेलोटेया डांबरी रस्त्याची थातूरमातूर दुरुस्ती केल्याचे परिणाम त्याचवेळी समोर आले होते. याप्रकरणी शिवसेनेने आंदोलन पुकारून सदर रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करावी, अशी मागणी लावून धरली होती. दबाव वाढत असल्याचे पाहून ‘पीडब्ल्यूडी’मध्ये मागील अनेक वर्षांपासून एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या व कंत्राटदारांसोबत थेट आर्थिक व्यवहार करणाºया एका वरिष्ठ अधिकाºयाने कंत्राटदाराला रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. काही दिवस रस्ता दुरुस्तीचे काम केल्यानंतर कंत्राटदाराने काम बंद केले होते.लोकप्रतिनिधी दखल घेतील काय?भाजप लोकप्रतिनिधींच्या निर्देशानुसार ‘पीडब्ल्यूडी’ने अशोक वाटिका रस्त्याची दुरुस्ती केली होती. अर्धा पावसाळा उलटला असून, पुढील पावसाचे दिवस लक्षात घेता खड्ड्यांमुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत भाजप लोकप्रतिनिधी या रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.