मूर्तिजापूर : जिल्ह्यातील पाथरकर समजाला पाथरुट समाजाचे जात प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, अशी मागणी करीत भटके विमुक्त आदिवासी महासंघाने विभागीय अध्यक्ष रामदास जाधव यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद आहे की, जिल्ह्यातील बाळापूर, अकोला, अकोट, मूर्तिजापूर येथे पाथरुट जातीचे प्रमाणपत्र वितरित करताना जिल्ह्यातील वेगवेगळ्या उपविभागीय स्तरावर जातीचा उल्लेख करून वेगवेगळ्या जातीचे प्रमाणपत्र दिले जाते. ही तफावत दूर करून एकाच पाथरुट जातीचे प्रमाणपत्र करण्यासाठी महासंघाकडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पाथरुट या संवर्गातील जातीची कोतवाल बुक नक्कलमध्ये ‘पाथरकार’ अशी नोंद आढळून येते. त्या आधारे पाथरुट या जातीचे प्रमाणपत्र मूर्तिजापूर तालुक्यातून वितरित करण्यात आले. परंतु अकोट, अकोला, बाळापूर या ठिकाणी या सर्व समाजबांधवांना कोतवाल बुकात पाथकार जातीची नोंद असताना त्यांना ‘पाथरवट १२-डी’ या जातीचे प्रमाणपत्र दिले जाते. ही तफावत असल्याने पाथरकार आणि पाथरुट या जात संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नोकरीच्या कामासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पाथरकार अशी जातीची नोंद असलेल्या नागरिकांना ‘पाथरुट ३-डी’ जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी भटके विमुक्त आदिवासी महासंघाच्या वतीने निवेदनातून केली आहे. निवेदन देताना विभागीय अध्यक्ष रामदास जाधव, सुनील जाधव, वामनराव गायकवाड, डिगांबर जाधव, श्रीकृष्ण जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (फोटो)