पातूर: शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, तालुक्यातील तब्बल ३८ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १४९६ वर पोहोचली असून, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १८९ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी तालुका प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ लस घ्यावी, अथवा तपासणी अहवालाशिवाय कुठल्याही कार्यालयात प्रवेश बंद असल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. शहरातील कार्यालयीन परिसरातच स्वॅब व आरटीपीसीआर तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. मात्र, शहरातील व्यावसायिक दुकाने सुरू ठेवून नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
-----------------------------------------------
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले आहेत. नागरिकांनीही कोरोनाविषयी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- दीपक बाजाड, तहसीलदार, पातूर.