पातूर: बाळापूर महामार्गाजवळील रेणुकामाता टेकडीला लागून असलेल्या एका टेकडीच्या आत काही पौराणिक लेण्या असून, या लेण्या पर्यटकांना आकर्षित करतात. लेण्यांबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत. काळ्या पाषाणात खोदलेल्या या लेण्या पौराणिक असल्याचे सांगतात. परंतु, लेण्या कोणत्या काळातील आहेत याबाबत मात्र अनभिज्ञता आहे.
टेकडीच्या आतमध्ये ऐतिहासिक भुयारी लेण्या असून अखंड काळ्या पाषाणात या लेण्या कोरल्या आहेत. लेण्यांची रचना पर्यटकांना आकर्षित करते. लेण्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे असून लेण्यांविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. या लेण्यांना गुप्त, बौद्धकालीन गुफासुद्धा मानल्या जाते. तर याच लेण्यांमध्ये श्रीकृष्ण आणि कालयवन यांचे कथानक घडल्याचे सांगण्यात येते. श्रीकृष्ण, कालयवन ऋषी पुत्राच्या हाताने भस्मिभूत केल्याची आख्यायिका आहे. अष्टमीला याठिकाणी नागरिक भोजन व धार्मिक कार्यसुद्धा करतात. या लेण्यांना अलीबाबा चालीस चोर...म्हणूनही नागरिक मानतात. या लेण्यांची रचना अत्यंत गुप्त पद्धतीने आणि अत्यंत कलाकुसरीने केलेली दिसते. लेण्यांच्या बाहेरूनही एक टेकडी दिसते. मात्र, या टेकडीच्या आत लेण्या असतील, अशी कल्पनासुद्धा मनात येत नाही. म्हणून, या लेण्यांना गुप्त गुहा म्हणूनसुद्धा ओळखले जाते. टेकडीवर गेल्यानंतरही या लेण्या सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत. लेण्यांच्या आतमधून एक मोठा सुरुंग खोदकाम करून मोठा रस्ता करण्यात आला होता. मात्र, तो रस्ता आता प्रशासनाने बंद केला आहे. पातूरच्या या लेण्यांमध्ये काळ्या पाषाणामध्ये आधुनिक रचनेसारख्या वेगवेगळ्या खोल्या कोरलेल्या आहेत. लेण्यांमध्ये चार ते पाच खोल्या आहेत. त्यामुळे या लेण्यांना तपस्वी योगी यांची लेणीसुद्धा म्हटले जाते. या लेण्यांतील खोल्यांमध्ये आतील बाजूस शिवलिंगाचीसुद्धा रचना असून व्यासपीठासारखे बसण्याचे आसनेसुद्धा अखंड काळ्या पाषाणतच तयार केले आहेत.
फोटो: ०३ एकेएलजीआर
उत्खननात सापडलेले बौद्धकालीन अवशेष
लेण्यांचे उत्खनन करीत असताना या ठिकाणी बौद्धकालीन अवशेष मिळाल्याची चर्चा होती. म्हणून, या लेण्यांना बौद्धकालीन गुहासुद्धा म्हटले जाते. पातूरच्या लेण्या केवळ पर्यटकांनाच नाहीतर चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शक, अभिनेत्री, अभिनेता यांनासुद्धा भुरळ घालतात. तीस वर्षांपूर्वी राघू मैना मराठी चित्रपटाचे चित्रीकरणसुद्धा याच ठिकाणी झाले होते.
पुरातत्त्व विभागाकडे संवर्धनाची जबाबदारी
केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने या लेण्यांच्या सभोवती असलेल्या टेकडी परिसराला लोखंडी जाळीने कंपाऊंड केले आहे. या लेणींची डागडुजीसह दुरुस्ती करण्यात आली आहे. पातूर शहर ज्या संत महापुरुषांच्या नावाने ओळखले जाते, ते नानासाहेब महाराज, शहा बाबा, संत सिदाजी बाबा, रेणुकामाता नवरात्र उत्सवसाठी दूरवरून नागरिक पातुरात येतात. या लेण्यांना पर्यटनस्थळ म्हणून मान्यता दिल्यास, शासनाला आर्थिक उत्पन्न मिळू शकते. या लेण्यांच्या सुरक्षेसाठी यापूर्वी दोन सुरक्षारक्षकांची केंद्र शासनाने नेमणूक केली होती. परंतु, सद्यस्थितीत येथे एकही सुरक्षारक्षक नाही.