पातूर : तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, २२१ सदस्यपदांसाठी ४७४ उमेदवार रिंगणात आहेत. २१९ जणांनी माघार घेतली असून, ३२ उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच तहसील कार्यालयात गर्दी केली होती.
तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती शिर्ला, आलेगावसह सस्ती, दिग्रस बुद्रुक, दिग्रस खुर्द, बेलुरा बुद्रुक, तांदळी बुद्रुक, बेलुरा बुद्रुक पास्टुल, विवरा, चतारी, उमरा, राहेर, मलकापूर, देऊळगाव, चान्नी, खानापूर भंडारज खुर्द, चरणगाव, मळसूर सायवनी, पिंपळखुटा, चांगेफळ या २३ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारीला निवडणूक होऊ घातली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये २२१ सदस्यपदांसाठी ४७४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. सोमवारी दुपारनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वितरणसुद्धा करण्यात आले आहे.
डमी पत्रिका तयार करून घरोघर जाऊन प्रचार करण्यासाठी उमेदवार सज्ज झाले आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या शिर्ला ग्रामपंचायतीच्या सहा वॉर्डांमध्ये प्रचारासाठी उमेदवारांना दमछाक करावी लागणार आहे. शिर्ला ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्यपदांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती झाल्याचे चित्र असल्याने येथील लढत चुरशीची ठरणार आहे. दरम्यान, सोमवारी निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्याने उमेदवारांनी सकाळपासूनच तहसील कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. (फोटो)