अकोला : कोरोनाची लक्षणे नसतील, तर कोविड रुग्णांना जिल्हा प्रशासनाने होम क्वारंटीनचा पर्याय खुला करून दिला आहे; मात्र त्यासाठी काही नियमांची अट घालण्यात आली आहे. या निर्णयाला मनपा क्षेत्रात लागू करण्यात अले असले, तरी तालुकास्तरावर अद्याप तरी ही मुभा नसल्याचे दिसून येत आहे.कोरोना रुग्णांसाठी होम क्वारंटीनचा पर्याय खुला केल्यानंतर मनपा आरोग्य विभागाकडे आतापर्यंत केवळ एका रुग्णाने मागणी केली आहे. या रुग्णाने मागणी केली असली, तरी त्याच्याकडे स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे की, नाही याची पडताळणी आरोग्य विभागामार्फत केली जाणार आहे. यासाठी मनपा आरोग्य विभागाच्या पथकामार्फत संबंधित रुग्णाच्या घराची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच संबंधित रुग्णाला होम क्वारंटीन करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. मनपा क्षेत्रात यासाठी हालचाली सुरू असल्या तरी तालुकास्तरावर अद्यापही हा पर्याय खुला करण्यात आला नसल्याचे दिसून येते.मनपा क्षेत्रात झोननिहाय पथक गठितहोम क्वारंटीनचा पर्याय घेणाऱ्या कोविड रुग्णांसाठी मनपा क्षेत्रात झोननिहाय चार पथक गठित करण्यात आले आहेत. रुग्णाकडून होम क्वारंटीनची मागणी झाल्यानंतर या पथकामार्फत संपूर्ण तपासणी केली जाईल. त्यानंतरच संबंधित रुग्णाला होम क्वारंटीनसाठी मान्यता दिली जाईल.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार, लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असणाºया रुग्णांना होम क्वारंटीनमध्ये राहता येणार आहे. अशा रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे.
- डॉ. फारुक शेख, वैद्यकीय अधिकारी, मनपा, अकोला.
अद्याप तरी तालुकास्तरावर कोविड रुग्णांसाठी होम क्वारंटीनची सुविधा सुरू करण्यात आली नाही. रुग्णाकडून मागणी झाल्यास परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल.- डॉ. राजकुमार चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला