दररोज करावी लागते इंजेक्शनची मागणी
दाखल रुग्णसंख्येनुसार सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे आरोग्य उपसंचालक कार्यालयात दररोज ऍम्पोटेरेसिन बी इंजेक्शनची मागणी करावी लागते. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध इंजेक्शनमधून पुरवठाही केला जातो; मात्र मागणीच्या तुलनेत इंजेक्शन कमी प्रमाणात दिले जातात. रुग्णालय प्रशासनाला ही कसरत रोजच करावी लागत आहे.
...तर फंगसचा होऊ शकतो मेंदूत शिरकाव
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची सुरुवात साधारणत: रुग्णाच्या नाकातून किंवा तोंडातून होते. हळूहळू या बुरशीचा फैलाव रुग्णाच्या डोळ्यांमध्ये व नंतर मेंदूपर्यंत होऊ शकतो. वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्णाचा डोळा काढण्याची वेळ येऊ शकते. तसेच फंगस मेंदूमध्ये शिरल्यास रुग्णाचा जीव वाचविणे कठीण असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी रुग्णांना इंजेक्शन देणे गरजेचे आहे; मात्र मागणीच्या तुलनेत ते मिळत नाही. इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. डॉक्टरांसोबतच वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या उपचारांसाठी आवश्यक सर्वच प्रयत्न करीत आहेत.
- डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय उपअधीक्षक, जीएमसी, अकोला