ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज उपचार व्यवस्था त्वरित सुरू करणे आवश्यक झाले आहे. दरम्यान कोरोना महामारीच्या संकटात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या ठिकाणी ९ मोठे व ५ लहान ऑक्सिजन सिंलिडर उपलब्ध करून दिले आहेत. या रुग्णालयात तीन रूम आहेत. प्रत्येक रूममध्ये ९ बेड आहेत. त्यापैंकी दोन रूम मध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येईल, अशी व्यवस्था तयार आहे. परंतु अद्यापही या रुग्णालयात ऑक्सिजनसह बेड रुग्णांना उपलब्ध करण्यात आले नाहीत. रुग्णांना अकोटातच सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना अकोल्यातील रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याची गंभीर समोर आली आहे.
रुग्णालयाची आरोग्यसेवा नावालाच!
रुग्णालयाची आरोग्यसेवा कुचकामी ठरत आहे. केवळ कोरोना चाचणी व लसीकरणच या ठिकाणी करण्यात येत आहे. नियोजन नसल्याने कोरोना रुग्णांवर उपचाराला फाटा देण्यात येत आहे. डॉक्टर जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे येथील डॉक्टर अनेक रुग्णांना अकोला येथील रुग्णालयात पाठवितात. त्यामुळे अकोला येथे रुग्णसंख्या वाढत आहे. आधीच जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या कमी आहे. अकोटातून पाठविलेल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन व बेड मिळत नसल्याने खासगी कोविड सेंटरमध्ये महागडे उपचार घ्यावे लागत आहे.
अकोट रुग्णालयात कोविड सेंटरची गरज
अकोट रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध असूनही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत नाहीत. रुग्णांवर थातुरमातुर उपचार करून त्यांची रवानगी थेट अकोला रुग्णालयात करण्यात येते. ग्रामीण भागात गावागावांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत पालकमंत्री, स्थानिक आमदारांनी पुढाकार घेत अकोट येथील रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची गरज आहे.
उपजिल्हा रुग्णालय कागदावरच मंजूर
अकोट तालुक्याशी अनेक आदिवासी गावे जोडली आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता, अकोट येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. जेणेकरून स्थानिक पातळीवर सर्व उपचार वेळेवर मिळू शकतील. परंतु गत २-३ वर्षापासून उपजिल्हा रुग्णालय कागदावरच आहे. प्रत्यक्षात कुठलीही वैद्यकीय सेवा, सुविधा सुरू करण्यात आली नाही.