राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ३४ रक्तपेढ्या कार्यरत आहेत. या रक्तपेढ्यांमार्फत दरवर्षी सुमारे १.५ लाख रक्त पिशव्या संकलित करून गरजू रुग्णांना त्याचा पुरवठा केला जातो. देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गरजू रुग्णांना सहज रक्त उपलब्ध व्हावे, या अनुषंगाने सर्वच घटकातील गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मध्यंतरी २७ एप्रिल २०१५ रोजी शासनाने परिपत्रक काढून रक्त पिशव्यांसाठी सेवा शुल्क दर निश्चित करण्यात आले होते; मात्र नवीन निर्णयानुसार आता शासकीय रुग्णालयात दाखल सर्वच घटकांना रक्तासाठी पैसे मोजावे लागणार नाही. हा निर्णय केवळ शासकीय रक्तपेढ्यांसाठीच असल्याने खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तासाठी आकारले जाणारे सेवा शुल्क कायम राहणार असल्याचीही माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
सेवा शुक्ल पीआयपीमधून
सर्वच घटकांतील रुग्णांना रक्त पुरवठा करताना सेवाशुल्क रद्द करण्यात आले आहे. या सेवा शुल्काची तूट राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २०२०-२१ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्याच्या (पीआयपी) माध्यमातून भरून काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
यापूर्व केवळ योजनांच्या लाभार्थ्यांना मिळायचे मोफत रक्त
शासकीय रुग्णालयात दाखल रुग्ण हा बीपीएल कार्डधारक किंवा इतर योजनांमध्ये पात्र ठरत असेल, तरच त्याला शासकीय रक्तपेढ्यांमार्फत मोफत रक्त किंवा रक्त घटक उपलब्ध व्हायचे. शासनाच्या नवीन निर्णयामुळे आता सर्वच घटकातील रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी जे रुग्ण योजनांमध्ये पात्र ठरत नसतील तर त्यांना नियमानुसार सेवा शुल्क आकारण्यात येत होते, मात्र शासनाच्या निर्णयामुळे आता सर्वच गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध होणार आहे. ही सुविधा केवळ शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांसाठीच आहे.
- डॉ. अजय जुनगरे, विभागप्रमुख, शासकीय रक्तपेढी, अकोला