अकोला : कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, ॲक्टिव्ह रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर काही रुग्ण प्रकृती गंभीर होईपर्यंत कोविड चाचणी न करता घरीच उपचार घेत आहेत. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या सुमारे ३५ पेक्षा जास्त रुग्णांचा २४ तासांत मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोनाचे चार हजारांपेक्षा जास्त ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांना लक्षणे नाही, तर काहींना सौम्य लक्षणे असल्याने ते गृहविलगीकरणात आहेत. असे रुग्ण घरीच उपचार घेऊन कोरोनावर मात करत आहेत. मात्र, काही रुग्ण उपचारास टाळत आहेत, तर काही कोविडची चाचणी न करताच घरगुती उपचार करीत आहेत. अशा रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात. रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू झाले, तरी ते उपचारास योग्य प्रतिसाद देत नाहीत. परिणामी, रुग्णालयात दाखल होताच त्यांचा २४ तासांच्या आत मृत्यू हाेतो. गत महिनाभरात सुमारे ३५ पेक्षा जास्त रुग्णांचा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांत मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
गृहविलगीकरणात सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा चार हजारांपेक्षा जास्त आहे. यापैकी सुमारे १५०० रुग्ण रुग्णालय तसेच संस्थात्मक विलगीकरणात आहेत. उर्वरित सर्वच रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.
कारणे काय? अनेक रुग्ण लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, तर काही घरीच उपचार घेतात. मात्र, प्रकृती गंभीर झाल्यानंतर असे रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. उशिरा उपचारास सुरुवात झाल्याने रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नाही. तोपर्यंत रुग्णाच्या फुफ्फुसावरील इन्फेक्शन आणि ऑक्सिजनची पातळी खालावते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांनी कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच नागरिकांनी कोविड चाचणी करून उपचारास सुरुवात करावी. हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो. त्यामुळे नियमित मास्क वापरा, वारंवार हात स्वच्छ धुवा तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला