अकोला: रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रताप हॉस्पिटलचा संचालक डॉ. अजयसिंह चव्हाण व कम्पाउंडर अमोल इंगळे या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णावर उपचारादरम्यान हलगर्जी केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृतकाच्या मुलाने डॉक्टरांसह कम्पाउंडरवर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.आकाश दशरथ वानखडे यांचे वडील दशरथ उत्तमराव वानखडे यांना प्रताप हॉस्पिटलमध्ये बवाशीरच्या उपचारासाठी २९ सप्टेंबर २०१८ रोजी भरती केले होते. रामदासपेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी दशरथ वानखडे आणि त्यांच्या नातेवाइकांना सांगितले, की ३० सप्टेंबर रोजी आॅपरेशन करण्यात येणार आहे, तर काही औषधे आणण्यास सांगितले. मृतकाच्या मुलाने औषधे आणून दिले. कम्पाउंडर अमोल शुद्धोधन इंगळे याने सलाइनमधून काही इंजेक्शन दिले. त्यानंतर रुग्णाची तब्येत खालावली. रुग्णाला सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. याच दरम्यान दशरथ वानखडे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाचा मुलगा आकाश दशरथ वानखडे यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली; मात्र तांत्रिक अडचणी आल्याने पोलिसांनी ती तक्रार चौकशीत ठेवली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपासणी करून सर्वोपचार रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मत मागितले होते; मात्र यात वेळ जात असल्याने आकाश वानखडे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपी डॉक्टर अजयसिंह व्ही. चव्हाण आणि अमोल शुद्धोधन इंगळे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.