अकोला: कोरोनाची लक्षणे असूनही आपल्याला काहीच झाले नाही, असा अनेकांचा समज असतो. त्यामुळे रुग्णालयातून पळ काढण्यासाठी अनेकदा रुग्ण विचित्र कारणे डॉक्टरांना सांगत असतात. जिल्ह्यात मात्र कोविड वॉर्डातून डिस्चार्ज मिळावा म्हणून रुग्ण होम क्वारंटीनचा पर्याय निवडतात; परंतु आरोग्य यंत्रणा सतर्क असून, पडताळणी केल्यानंतरच रुग्णांना डिस्चार्ज देत आहे.
कोरोनाबाधित रुग्णाकडून इतरांना संसर्ग होऊ नये या अनुषंगाने सात दिवस रुग्णाला रुग्णालयातच ठेवले जाते; परंतु अनेकांना कोरोनाची लक्षणे नसल्याने ते घरी जाण्यासाठी घाई करत असतात. त्यासाठी रुग्ण काही गमतीशीर कारणे पुढे करतात; मात्र आरोग्य यंत्रणा याबाबतीत सतर्क असून, उपचाराचे सात दिवस झाल्याशिवाय रुग्णाला सुटी देत नाही. त्यामुळे रुग्ण अनेकदा विचित्र कारणे सांगून रुग्णालयातून पळ कढण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी रुग्ण होम क्वारंटीनचा पर्याय निवडतात; परंतु रुग्ण होम क्वारंटीनचे निकष पूर्ण करत असेल तरच त्याला रुग्णालयातून सुटी दिली जाते.
ही सांगितली जातात कारणे
१) नातेवाइकांच्या आजारांचे कारण पुढे करून काही रुग्ण रुग्णालयातून सुटी मिळविण्याचा प्रयत्न करतात; परंतु अशा कारणामुळे रुग्णाला सुटी दिली जात नाही.
२) काैटुंबिक समस्या किंवा लहान मुलांचा संभाळ करायचा म्हणूनही काही रुग्ण कारण सांगतात.
३) तर डिस्चार्जसाठी बहुतांश रुग्ण होम क्वारंटीनचा पर्याय निवडतात.
७ दिवस उपचार केल्यानंतरच सोडल्या जाते घरी
ज्या रुग्णाना कोरोनाची लक्षणे आहेत, आशा रुग्णाना सात दिवस उपचारानंतरच रुग्णालयातून सुटी दिली जाते; परंतु रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा नसेल तर रुग्णाला सुटी दिली जात नाही. लक्षण नसलेल्या रुग्णाला मात्र लवकर सुटी दिली जाते. सुटी दिल्यानंतरही रुग्णाला होम क्वारंटीन केले जात असून, तसे हमीपत्र रुग्णाकडून भरून घेतले जाते.
रुग्ण प्रामुख्याने होम क्वारंटीनसाठी आग्रह करतात.; परंतु रुग्णाची संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय त्यांना सुटी दिली जात नाही.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला