अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत डिस्चार्ज रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने खाटांची तडजोड करताना रुग्णालय प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. परिणामी तास दीड तास रुग्णांना बेड विनाच उपचार घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, जिल्ह्याचा बहुतांश भार सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ४५० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, त्या देखील अपुऱ्या ठरत आहेत. अशा परिस्थितीत दरराेज शेकडोच्या संख्येत रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे ३० खाटांचा अतिदक्षता विभाग आणि इतर कोविड वॉर्ड फुल्ल राहत आहेत. खाटा शिल्लक नसल्याने रुग्णांना खालीच उपचार घ्यावा लागत असल्याचे चित्र गत काही दिवासांपासून दिसून येत आहे. ही स्थिती तास, दीड तासांसाठी असली, तरी या कालावधीमध्ये रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करुन देताना रुग्णालय प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे.
मनुष्यबळ वाढविण्याची गरज
सर्वोपचार रुग्णालयात वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. ही स्थिती पाहता सर्वाेपचार रुग्णालयात मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेच नाही
सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णसंख्येचा वाढता ताण लक्षात घेता गत वर्षी रोजंदारी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी निधीच उपलब्ध नसल्याने गत सहा महिन्यांपासून ते मानधनाविनाच सेवा देत असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.