जीएमसीसह खासगी कोविड रुग्णालये हाऊसफुल्ल
जिल्ह्यात काेविडच्या सौम्य लक्षणांच्या तुलनेत गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गत वर्षभरात ही स्थिती जिल्ह्यात पहिल्यांदाच उद्भवली आहे. त्यामुळे गत महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या खाटांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयेदेखील हाऊसफुल्ल झाली आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णाला खाट मिळणेही कठीण झाले आहे.
वैद्यकीय सोईसुविधा पडताहेत अपुऱ्या
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यात उपलब्ध वैद्यकीय सोईसुविधा अपुऱ्या पडत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत डिस्चार्ज दिल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. अनेकांना वेळेवर व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. या परिस्थितीमुळे काहींना जीवही गमवावा लागल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. शिवाय, गत १५ दिवसांत जिल्ह्यात ऑक्सिजनचाही तुटवडा भासत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे.