अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात हर्नियासह अपेन्डीसच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्याची माहिती समोर आली आहे. वेळेत शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्ण वेदनांमुळे त्रस्त झाले आहेत.पावसामुळे सर्वोपचार रुग्णालयात अस्वच्छतेमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रुग्णांना आजाराच्या असह्य वेदनांना सामोरे जावे लागत आहे. या पूर्वी एप्रिल २०१९ मध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी सर्वोपचार रुग्णालयातील काही किरकोळ शस्त्रक्रिया थांबवून ठेवल्याची घटना उघडकीस आली होती; मात्र सध्या परीक्षा नसतानाही या प्रकारे शस्त्रक्रियेस विलंब होण्याचे कारण स्पष्ट होत नाही.शिवाय, येथील अस्वच्छता आणि दुर्गंधी आणि उन्हाचे चटके यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही किरकोळ शस्त्रक्रिया थांबविण्यात येतात. त्या शिवाय, या विद्यार्थ्यांची परीक्षा होणे शक्य नाही. असे असले, तरी रुग्णावरील उपचार थांबविण्यात येत नाहीत.- डॉ. कुसुमाकर घोरपडे,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय